
सध्याच्या घडीला मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवण्याचा ट्रेंड फार मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. मातीच्या भांड्याना म्हणून शहरी भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे. मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नापेक्षा अधिक स्वादिष्ट असते कारण मातीची भांडी ओलावा आणि उष्णता टिकवून ठेवते त्यामुळे अन्न व्यवस्थित शिजते. त्याचवेळी त्या अन्नामध्ये मातीची चव आणि सुगंध उतरत असल्यामुळे, त्या अन्नाची चवही वाढते. मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने तुमचे अन्न अधिक पौष्टिक बनते. मातीच्या भांड्यामधील अन्नात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, सल्फर यांसारखी खनिजे आणि जीवनसत्त्वे तत्वे उतरतात.
मुंबईसारख्या घरांमध्ये आज मातीची भांडी दिसू लागली आहेत. खास मातीच्या भांड्यात पदार्थ घरी शिजू लागलेला आहे. आताच्या घडीला आपल्याकडे स्वयंपाक करण्यासाठी हजारो मशीन, वेगवेगळी उपकरणे बाजारात आहेत. पण असे असले तरी कधीतरी मातीच्या डेचकीत किंवा गाडग्यामध्ये चिकन, मटण किंवा साधी आमटी करून बघा नक्कीच चवीष्ट होईल.
मातीच्या भांड्यात अन्न हळूहळू शिजते, जेणेकरून अन्नाचे पोषण अबाधित राहते. तर इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात अन्न शिजवताना अन्नाचे पोषण कमी होते.
जेव्हा तुम्ही अन्न गरम करता तेव्हा अन्नातून पोषक तत्वे कमी होतात आणि ते अन्न तुमच्यासाठी फायदेशीर नसते.
काही पदार्थ असे असतात की ते पुन्हा गरम केल्यावर हानिकारक ठरतात. मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने ते बराच काळ गरम राहते कारण त्याचे तापमान बराच काळ टिकून राहते आणि अन्न पुन्हा गरम करण्याची गरज नसते.