गाजर 120 रुपये तर लसूण 400 रुपये किलो, घाऊक महागाईने गाठला चार महिन्यांचा उच्चांक

महागाईच्या दराने 14 महिन्यांचा उच्चांक नोंदवल्याचे समोर आले असताना आता  घाऊक महागाईनेदेखील गेल्या चार महिन्यांचा उच्चांक गाठला असून भाजीपाला, कडधान्ये कडाडली आहेत. तर तेलाचेही भाव चांगलेच तडतडले आहेत. बाजारात गाजर तब्बल 120 रुपये किलो, तर लसूण 400 किलोने मिळत असून कडधान्याचेही दर 180 रुपये किलोच्या घरात पोहोचले आहेत. ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाई 2.36 टक्क्यांपर्यंत वाढली, तर सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई 1.84 टक्के होती. भाजीपाला आणि खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्याने महागाई वाढल्याचे चित्र आहे.

महागाई वाढल्याने उत्पादक क्षेत्रांवर त्याचा नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसत आहे. घाऊक किमती दीर्घकाळ चढय़ा राहिल्यास उत्पादक झालेल्या नुकसानीचा भार ग्राहकांवर टाकतात. त्यामुळे सरकार करामध्ये भरमसाट वाढ करत असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचे दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ झाली असून आपोआपच तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. त्यामुळे दिवाळीनंतरही सर्वसामान्यांचे दिवाळे निघत असल्याचे चित्र आहे. बाजारात माल कमी प्रमाणात येत असून महागाईवर कुणाचेच नियंत्रण राहिले नसल्याचे भाजीविक्रेते दिनेश गुप्ता यांनी सांगितले.

z कडधान्य, गहू, भाजीपाला, तेलबिया, खनिजे आणि क्रूड पेट्रोलियम हे महागाईच्या कात्रीत सापडले.

z जीवनावश्यक वस्तूंचा महागाई दर 8.09 टक्क्यांपर्यंत वाढला तर खाद्यपदार्थांची महागाई 11.50 टक्क्यांवर गेली आहे.

z मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्टचा घाऊक महागाई दर 1 टक्क्यांवरून 1.50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

भाजीपाला, तेल, कडधान्ये सगळेच महागले. ऐन निवडणुकांमध्येही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आता खायचे काय आणि जगायचे कसे असा प्रश्न आहे.

शैलेजा करपे

(गृहिणी, प्रभादेवी)

 भाजीपाला आधीचे दर आताचे दर

गाजर              60 रु.         100 रु.

लसूण            200 रु.        400 रु.

फ्लॉवर            60 रु         100 रु.

शिमला मिरची 60 रु.         100 रु.

कोबी               40 रु.          80 रु.

वांगी               60 रु.         100 रु.

भेंडी                60 रु.         100 रु.

कांदा               50 रु.          80 रु.

धान्य/तेल      आधी         आता

तांदूळ               60 रु.          80 रु.

मूगडाळ           100 रु.        120 रु.

चणाडाळ           80 रु.         100 रु.

हिरवा वाटाणा  120 रु.        180 रु.

तेल                 130 रु.        160 रु.