देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी कोणाचे फोन आले होते? संदीप क्षीरसागर यांचा सवाल

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा नोंद होण्यासाठी 10 ते 12 तास उशीर लागला, असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी कोणाचे फोन आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच अधिकाऱ्यांचे कॉल रिकॉर्ड काढा, असं क्षीरसागर म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मीकी कराड असून त्यावर 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही आणि त्यावर मकोकाही लावण्यात आला नाही, असाही आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला.

काय म्हणाले संदीप क्षीरसागर?

माध्यमांशी संवाद साधताना संदीप क्षीरसागर म्हणाले की, ”संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा नोंद होण्यासाठी 10 ते 12 तास उशीर लागला, याचे कारण काय? याप्रकरणी गुन्हा नोंद न करण्यासाठी कोणाकोणाचे फोन आले? अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड जर तपासले, तर हे स्पष्ट होईल. 28 तारखेपर्यंत एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते. जेव्हा लोक 28 तारखेला रस्त्यावर उतरले तेव्हा तिथून ते (वाल्मीकी कराड) फरार झाले. इतकं कोणाचं संरक्षण त्यांना मिळत आहे?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

क्षीरसागर पुढे म्हणाले की, ”या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मीकी कराड आहे, अद्यापही कटकारस्थानमध्ये त्याचं नाव आलं नाही. त्यावरही मकोका लावण्यात आला पाहिजे आणि 302 मध्ये कधी त्याचं नाव येतं, याची लोक वाट पहात आहेत.”