वडील रिक्षाचालक, लोकल स्पर्धेत MI ने पोराला हेरले; IPL पदार्पणात CSK विरुद्ध 3 विकेट घेणारा विघ्नेश पुथुर कोण आहे?

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील तिसरा सामना पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. या लढतीत चेन्नईने मुंबईचा 4 विकेट्सनी पराभव केला. अर्थात या विजयानंतर चेन्नईपेक्षा मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू विघ्नेश पुथुर याचीच सोशल मीडियावर जास्त चर्चा सुरू आहे. रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरलेल्या विघ्नेशने चेन्नईच्या तीन फलंदाजांना पवेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्या या दमदार कामगिरीचे विरोधी संघाचा खेळाडू धोनीनेही कौतुक केले.

चेन्नईच्या एम चिदंबरम मैदानावर झालेल्या लढतीत मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 155 धावा केल्या होत्या. त्यानंतर चेन्नईचा संघ आरामात हा सामना जिंकेल असे वाटत असताना विघ्नेशने ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुड्डा अशा एका मागोमाग एक तीन विकेट घेत सामना रोमांचक केला. विघ्नेशने चार षटकांची गोलंदाजी करत 32 धावा देत 3 विकेट घेतल्या. हा सामना मुंबईने गमावला असला तरी विघ्नेशची चर्चा क्रीडा वर्तुळात सुरू आहे.

विघ्नेश पुथुर हा केरळच्या मलप्पुरम येथील रहिवासी आहे. त्याचे वडील रिक्षा चालक आहेत. विघ्नेशने आत्तापर्यंत प्रथम श्रेणीचा एकही सामना खेळलेला नाही. सुरुवातीला वेगवान गोलंदाजी करणाऱ्या विघ्नेशला मोहम्मद शेरीफने फिरकीपटू बनण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर विघ्नेशने फिरकी गोलंदाजी सुरू केली आणि स्थानिक स्पर्धा, तसेच कॉलेज अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये छाप उमटवली.

केरळ टी ट्वेंटी लीगमध्येही विघ्नेश खेळला असून तिथे त्याने 3 लढतीत 2 विकेट्स घेतल्या होत्या. याच दरम्यान मुंबई इंडियन्सच्या स्काउटिंग टीमची नजर त्याच्यावर पडली. मुंबई इंडियन्सने त्याला ट्रायलला बोलवले. अचूक टप्पा आणि चेंडू वरील नियंत्रण पाहून मुंबई इंडियन्सने मेगा ऑप्शनमध्ये त्याला 30 लाख रुपये मोजून आपल्या ताब्यात घेतले.

विघ्नेशला मोठी स्पर्धा खेळण्याचा अनुभव नव्हता. तसेच तो फर्स्ट क्लास क्रिकेटही खेळलेला नव्हता. त्यामुळे दडपणात कसे खेळायचे याचा अनुभव यावा म्हणून त्याला मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी लीगला पाठवले. मुंबई इंडियन्स केपटाउन संघात तो नेट बॉलर म्हणून गोलंदाजी करत होता. तिथेच रशीद खान सारख्या अव्वल फिरकी गोलंदाजासोबत त्याने सराव केला आणि टिप्स घेतल्या. त्यानंतर मुंबईत परतलेल्या विघ्नेशने रिलायन्स संघाकडून डी वाय पाटील मैदानावर तीन सामनेही खेळले. आता त्याने आयपीएलच्या पदार्पणाच्या लढतीतच 3 विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)