देशमुख हत्याप्रकरणातील बडा नेता कोण? तत्काळ नाव जाहीर करा; अंजली दमानिया यांची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला 20 दिवस उलटूनही अद्याप अटक करण्यात आली नाही. या घटनेवरून राजकीय वातावरण तापत आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असून त्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध आहेत. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी जनतेसह विरोधकांची मागणी आहे. तसेच आता अंजली दमानिया यांनी या प्रकरणाबाबत मोठा दावा केला असून या प्रकरणातील बड्या नेत्याचे नाव तत्काळ जाहीर करा, अशी मागणी केली आहे.

देशमुख हत्याप्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आला आहे. सीआयडी पथकाने तपासाला सुरुवातही केली आहे. सीआडी तपासात महत्त्वाच्या गोष्टी उघड झाल्या आहेत. त्याची माहिती दमानिया यांनी देत या प्रकरणात बड्या नेत्याचा हात असल्याचा दावा केला आहे, याबाबत दमानिया यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सीआयडीला स्कॉर्पियो गाडीमधे 2 मोबाईल मिळाले आहेत. त्याचा डेटा रिकवर करण्यात येत आहे. त्यात संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ आहेत. अशा प्रकारे मारहाण करत त्याचे व्हिडीओ बनवणे हे निर्घृणच नाही, तर क्रूकपणाचे लक्षण आहे. तसेच या घटनेच्या वेळी एका बड्या नेत्याचा फोनही गेला आहे. याची माहिती जनतेला देण्यात यावी, असे दमानिया यांनी म्हटले आहे.

या प्रकरणातील बडा नेता कोण आहे, याची माहिती सर्वांनाच आहे. मात्र, आता तो बडा नेता कण आहे. त्याचे नाव तत्काळ जाहीर करण्यात यावे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. कोण आहे हा बडा नेता, त्याचे नाव तत्काळ जाहीर करा, असे दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.