
समय रैनानंतर आता कुणाल कामराच्या शोवरून वादंग उठलेला आहे. नुकतेच रणबीर अलाहाबादिया याने समय रैनाच्या शोवर केलेल्या एका वक्तव्यामुळे, रोषाला सामोरं जावं लागलं. आता कुणाल कामराच्या एका विडंबनात्मक गाण्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. या एका गाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी एका गाण्याच्या विडंबनातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, ज्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
समय रैना आणि कुणाल कामरा यांच्यातील वादांमध्ये, एक अशी व्यक्ती आहे ज्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे आणि ती व्यक्ती म्हणजे हॅबिटॅट ग्रुपचे संस्थापक आणि मालक बलराज सिंग घई. बलराज सिंग घई यांना समय रैनाच्या शोमध्ये अनेकदा पाहिले असेल. समय रैनाच्या शोवरील वादावेळी बलराज सिंह घई यांचा हॅबिटॅट ग्रुप चर्चेत होता आणि पुन्हा एकदा कुणाल कामराच्या राजकीय व्यंग्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. या दोन्ही वादांचा हॅबिटॅट ग्रुपचे मालक बलराज सिंग घई यांच्याशी विशेष संबंध आहे. दोन्ही वेळा जेव्हा कॉमेडी शोमध्ये गोंधळ झाला तेव्हा शोचे ठिकाण हॅबिटॅट ग्रुपचे होते.
सध्याच्या घडीला तोडफोडीनंतर, हॅबिटॅट ग्रुपने हा क्लब बंद केला आहे. यासोबतच, ग्रुपच्या मालकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि स्पष्ट केले की ते फक्त कॉमेडी शोसाठी जागा देतात आणि शोमध्ये सादर होणाऱ्या कंटेंटशी त्यांचा काहीही संबंध नाही. बलराज सिंह घई यांनी हॅबिटॅट ग्रुपच्या अधिकृत हँडलवरून आणि त्यांच्या वैयक्तिक इंस्टाग्राम हँडलवरून क्लबवरील हल्ल्याचा निषेध करणारी एक पोस्ट शेअर केली आणि कुणाल कामरा वादाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.