
पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) तब्बल 13 हजार 500 कोटी रुपयांचा चूना लावणारा हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. पीएनबी घोटाळा 2018 मध्ये उघडकीस आला होता. तब्बल सात वर्षांनंतर चोक्सीला अटक करण्यात आली असून, त्याच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानकडून प्रयत्न सुरू आहेत. बेल्जियमच्या फेडरल पब्लिक सर्व्हिस ऑफ जस्टिसने चोक्सीच्या अटकेची माहिती दिली.
एनडीटीव्ही या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मेहुल चोक्सी 2018 मध्ये हिंदुस्थानातून पळून गेला होता. हिंदुस्थानातून फरार झाल्यानंतर मेहुल चोक्सीने अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व घेतले. प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी तो बेल्जियमला आला होता. त्याची पत्नी प्रीती चोक्सीही सोबत आहे. बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये ते राहत होते. ही माहिती सीबीआयला मिळताच बेल्जियम पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर मेहुल चोक्सी याला 12 एप्रिल रोजी बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. मेहूल चोकसी हा 13 हजार 500 कोटी रुपयांच्यां PNB घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असून त्याचा भाचा नीरव मोदी हा देखील या प्रकरणातील सह आरोपी आहे.
मेहुल चोक्सीने ‘हनी-ट्रॅप’ आणि अपहरणाच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हंटले होते. या वेळी बारबरा जबारिका नावाच्या महिलेचेही नाव समोर आले. हंगेरीची रहिवासी बारबरा जबारिका हिने चोक्सीला हनी-ट्रॅपमध्ये अडकवल्याचे चोक्सीने सांगितले. त्याचे जबरदस्तीने अपहरण करण्यात आले, छळ करण्यात आला आणि अँटिग्वाहून बोटीतून डोमिनिकाला नेण्यात आले. यावेळी बारबरा देखील या संपूर्ण प्रकरणात सहभागी होती, असे मेहुल चोक्सीने सांगितले.
बारबरा जबारिका कोण आहे?
बारबरा जबारिकाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती बल्गेरियातील एक प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट एजंट आहे. त्यांने आपल्या प्रोफाईलमध्ये स्वत:ला सेल्स नेगोशिएटर असल्याचे म्हंटले आहे. तसेच तिला रिअल इस्टेट आणि डायरेक्ट सेल्स क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. जेव्हा मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली तेव्हा तो बारबरा जबारिकाच्या प्रेमात पडल्याचा दावा करण्यात आला होता. 2020 मध्ये या दोघांची भेट झाली होती आणि बारबरा ही हनीट्रॅप कटाचा भाग होती असा दावा मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सीने केला होता.
दरम्यान, मेहुलने या आरोपांना दुजोरा दिला नाही. याउलट त्याने बारबराने आपल्याला फसवले असल्याचे सांगितले. बारबरा जबारिकाने त्याच्याशी खोटी मैत्री केली. यानंतर तिने माझ्या कथीत अपहरणाच्या आधी मला रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रीत केले. यावेळी तिथे पोहोचताच बारबरा जबरदस्तीने मेहुल यांना सोबत घेऊन गेली, असे मेहुल यांने सांगितले. मात्र, बारबराने हे दावे फेटाळून लावले आहेत.
चोक्सीला बेल्जियममधून अटक, हिंदुस्थानकडून प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू