Who is Ashwani Kumar – पदार्पणातच भीम पराक्रम, फक्त एक केळं खाऊन KKR चा बँड वाजवणारा अश्वनी कुमार कोण आहे?

सोमवारी वानखेडेवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने कोलकाताचा आठ विकेट्सने दारुण पराभव करत यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला. कोलकाताने विजयासाठी दिलेले 117 धावांचे आव्हान मुंबईने दोन गड्यांच्या मोबदल्यात तेराव्या षटकातच पूर्ण केले. मुंबईच्या विजयामध्ये पदार्पणवीर अश्वनी कुमार याने छाप सोडली.

23 वर्षीय अश्वनी कुमार याने आयपीएलमध्ये स्वप्नवत पदार्पण केले आहे. पहिल्या चेंडूवर त्याने कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याला तिलक वर्माच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर अश्वनीने कोलकाताची मधली फळी कापून काढली आणि मुंबईचा संघ पहिल्या विजयाकडे अग्रेसर झाला. अश्वनीने अजिंक्य रहाणेसह रिंकू सिंह, मनीष पांडे आणि आंद्रे रसेल हे चार महत्त्वाचे खेळाडू टिपले. पदार्पणातच त्याने अवघ्या तीन षटकात 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. आयपीएल इतिहासामध्ये पदार्पणाच्या सामन्यातच चार विकेट घेणारा तो पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. या कामगिरी बद्दल त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ हा पुरस्कारही देण्यात आला.

अश्वनी कुमार हा मूळचा पंजाब राज्यातील मोहाली येथील आहे. शेर ए पंजाब टी20 मालिकेमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे तो चर्चेत आला होता. मेगा लिलावात मुंबईने त्याला तीस लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले. तत्पूर्वी 2024 ला तो पंजाब किंग्सच्या संघातही होता मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

पंजाबचा राष्ट्रीय संघाकडून तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळला आहे. 2022 ला त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत चार सामने खेळले. यात त्याने 8.5 च्या इकॉनॉमिने तीन विकेट्स घेतल्या. तसेच पंजाब कडून तो प्रथम श्रेणीचे दोन आणि ‘लिस्ट ए’चे चार सामनेही खेळला आहे.

दरम्यान, सामना संपल्यानंतर समालोचक रवी शास्त्री यांनी त्याला एक प्रश्न विचारला. ‘हा तुझा पहिलाच सामना होता. आतापर्यंत एकही हिंदुस्थानी गोलंदाजाला पदार्पणातच चार विकेट्स घेता आलेल्या नाहीत. तू दुपारच्या जेवणामध्ये नेमकं काय खाल्लं होतंस?’ असा प्रश्न रवी शास्त्री यांनी विचारला. त्याला उत्तर देताना अश्वनी कुमार म्हणाला की, ‘दुपारच्या जेवणामध्ये मी काहीच खाल्लं नाही, फक्त एक केळी खाऊन मैदानात उतरलो. खूप प्रेशर असल्याने मला भूकच लागली नव्हती.’ यावर रवी शास्त्री त्याला म्हणाले की, ‘जबरदस्त! तुझ्या बॅगेमध्ये नेहमी केळी ठेवत जा.’