
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत रोमहर्षक झालेल्या या लढतीत दिल्लीने बाजी मारली. लखनऊने विजयासाठी दिलेल्या 210 धावांचा पाठलाग करताना एकवेळ दिल्लीची अवस्था 6 बाद 113 झाली होती. मात्र त्यानंतर आशुतोष शर्मा याने बॅट फिरवायला सुरुवात केली आणि दिल्लीला एका विकेटने विजय मिळवून दिला.
लखनऊने विजयासाठी दिलेल्य़ा आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची अवस्था खराब झाली होती. दिल्लीचे रथीमहारथी फलंदाज बाद झाले होते. दिल्लीने 6.4 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावल्या होत्या. तेव्हा आशुतोष शर्मा फलंदाजीला उतरला. पहिल्या 20 चेंडूत आशुतोषने 20 धावा केल्या. मात्र त्यानंतर पुढील 11 चेंडूत 46 धावा चोपत संघाला 3 चेंडू बाकी असताना विजय मिळवून दिला. आशुतोष 31 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 66 धावा काढून नाबाद राहिला. विपराज निगम यानेही 15 चेंडूत 39 धावा करत त्याला उत्तम साथ दिली.
कोण आहे आशुतोष शर्मा?
मध्य प्रदेशच्या रतलाम येथे 15 सप्टेंबर 1998 रोजी आशुतोष शर्मा याचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेट बनण्याचे स्वप्न पाहत त्याने घर सोडले आणि इंदूरमध्ये आला. परिस्थिती एवढी बिकट होती की आई-वडीलही त्याला सोडून गेले. अनेकदा खिशात पैसेही नसायचे. तेव्हा 10 वर्षाचा आशुतोष छोटे-मोठे काम करून आपले पोट भर होता. एका मुलाखतीमध्ये आशुतोषने आपल्या संघर्षाची गाथा सांगितली होती.
लहान वयामध्ये मी रतलाममधून इंदूरला आलो. घरच्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचे निश्चित केले होते. अनेकदा पैसे नसायचे तेव्हा अम्पायरिंग करायचो आणि त्यातून एक वेळचे जेवण मिळायचे. एकटा राहत असल्याने छोटी-मोठी कामंही केली. अक्षरश: लोकांचे कपडेही धुतले, असे आशुतोषने सांगितले.
अमय खुरसिया यांच्यासोबत आशुतोषने आपल्या तंत्रावर काम केले आणि पुढे तो मध्य प्रदेशच्या संघापर्यंत पोहोचला. 2018 मध्ये आशुतोषने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. 2020 मध्ये त्याने अंडर-23 स्पर्धेत दोन शतकही ठोकले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतही त्याने 6 लढतीत 3 अर्धशतक ठोकले, पण त्यानंतरही त्याला संघातून बाहेर काढण्यात आले. यामुळे त्याने मध्य प्रदेशचा संघ सोडून रेल्वेच्या संघात जाण्याचा निर्णय घेतला.
Who is Vipraj Nigam – आयपीएलमध्ये लखनऊविरुद्ध ‘भौकाल’ उडवणारा विपराज निगम कोण आहे?