
औषधी असलेल्या सफेद कांद्याची वाडाच्या बाजारपेठेत एण्ट्री झाली असून त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. चविष्ट तसेच आरोग्याला गुणकारी असलेला हा कांदा विकत घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. एका माळेला 130 रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना लक्ष्मीदर्शन होत आहे.
वाडा तालुक्यातील प्रामुख्याने चांबळे, डाखवली, असनस, चिखला, गातेस, केळठण या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जात असे. त्यानंतर वाडा तालुक्यातील इतरही गावांमध्ये शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करू लागले. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने तालुक्यात सफेद कांद्याची लागवड केली जाते. सध्या दोन किलो वजनाची एक माळ 130 रुपयेप्रमाणे विकली जात आहे. यावर्षी चांबळे गावातील कांदा बाजारात दाखल झाला आहे. नैसर्गिक संकटांवर मात करून शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक घेतले.
ही आहेत वैशिष्ट्ये
वाड्यात पिकणारा सफेद कांदा अतिशय रुचकर असल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणात सलाडमध्ये होतो. हा कांदा खरेदी करण्यासाठी ठाणे, मुंबई परिसरातील अनेक ग्राहक वाडा बाजारपेठेत येत असतात. कांद्याच्या एका माळेचे वजन दोन किलोपर्यंत आहे. अलिबागमधील सफेद कांद्याला चांगला भाव मिळतो. मात्र आम्हाला उत्पादन खर्चाच्या मानाने भाव मिळत नाही. तरी शासनाने अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी विवेक पाटील यांनी केली आहे.