
रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावामध्ये बिबट्याचे पांढऱ्या रंगाचे दुर्मिळ पिल्लू आढळून आले आहे. त्यामुळे बिबट्याचे पिल्लू सध्या जिल्ह्याच चर्चेचा विषय ठरलं आहे. या पिल्लाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने परिसरात कॅमेरे लावले आहेत. या पिल्लाची त्याच्या आईसोबत पुनर्भेट झाली असून पिल्लाचे डोळे अजून उघडले नाहीत.
एका गावामध्ये काजू लागवडीसाठी झाडे तोडत असताना तिथे ग्रामस्थांना बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली. त्यातील एक पिल्लू हे नियमित बिबट्याच्या रंगाचे होते तर, दुसरे पिल्लू हे पांढऱ्या रंगाचे होते. त्यावेळी ग्रामस्थांनी पिल्लांची छायाचित्रे टिपली. त्याचवेळी पिल्लांच्या आईने ग्रामस्थांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ तिथून पळून गेले. ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती वनविभागाला कळवली. वनविभागाचे परिक्षेत्र वनाधिकारी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली. पांढऱ्या रंगाचे पिल्लू आढळणे ही अतिशय दुर्मिळ गोष्ट होती. गुणसुत्रामधील बदल त्याचे शारिरीक स्वरूप यामुळेच प्राण्यांच्या शरीराच्या रंगात बदल होतो. शरीराचा रंग ठरवणारे मेलेनीन रंगद्रव्य कमी झाल्यामुळे पिल्लाला हा पांढरा रंग येतो, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.