राज्यातील मिंधे सरकार विविध योजनांवर कोट्यवधी रुपयांची उधळण करीत असतानाच शहापूर तालुक्यातील कातकरी समाजाची 618 मुले कुपोषित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही मुले सॅम व मॅम श्रेणीतील असून शहापूर पंचायत समितीच्या अहवालामध्ये ही आकडेवारी उघडकीस आली आहे. ‘सरकार तुपाशी.. आदिवासी उपाशी’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून कुपोषणाविरुद्ध लढण्यासाठी मिळणारा कोट्यवधी रुपयांचा निधी कुणाच्या घशात जातो, असा संतप्त सवाल शहापूरवासीयांनी केला आहे.
शहापूर हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य विषयक असंख्य समस्यांना येथील रहिवाशांना सामोरे जावे लागते. त्यात आता कुपोषणाची गंभीर समस्याही निर्माण झाली आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघ येथील लोकप्रतिनिधींनी कुपोषणाच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. आता तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातील कुपोषणाची समस्या अधिक गंभीर बनली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षांचा कालावधी लोटला. तरीदेखील अजूनपर्यंत शहापूर तालुक्यातील आदिवासी, कातकरी समाज मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. विविध आश्रम शाळांमध्ये 5971 जणांच्या जन्म-मृत्यूची नोंदच शासन दप्तरी झाली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहापूर तालुक्यात कुपोषणाची गंभीर समस्या असतानाच अन्य समस्याही गंभीर बनल्या आहेत. हजारो कातकरी बांधवांना सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. तरीदेखील मिंधे सरकार ऐन निवडणुकीत फसव्या जाहिराती करीत असून त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन स्थानिकांनी केले आहे.