खेड-शिवापूर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटींची रोकड जप्त केली होती. मात्र, अद्याप ही रक्कम कुठून आली?, ती कुणाची होती?, कोठे नेली जात होती? याची माहिती पोलिस, निवडणूक आयोग, आयकर व महसूल विभागाने का दिली नाही?, एवढी मोठी रक्कम सापडून देखील गुन्हा का दाखल झाला नाही?, असा सवाल महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी उपस्थित केला.
यंत्रणा केवळ महाविकास आघाडीला टार्गेट करत असून, महायुतीच्या बाजूने झुकते माप देत आहे, असा आरोपही त्यांनी केली. खेड-शिवापूर टोल नाक्यावर पोलिसांनी पाच कोटींची रोकड जप्त केली होती. मात्र, या प्रकरणात इतकी मोठी रक्कम जप्त होऊनही गुन्हा दाखल झाला नाही. याबद्दल पोलिस, निवडणूक आयोग आणि आयकर विभाग माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप जैन यांनी केला.
हा नरेटीव सेट करण्याचा प्रयत्न
गेल्या काही दिवसांपुर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बॅग हॅलीपॅडवरच निवडणूक अधिकाऱयांनी तपासली. विरोधकांच्या बाबतीत नॅरेटीव सेट करायचा घाट घातला जात आहे. या सर्व प्रकारांवरून पोलीस, निवडणूक आयोग, आयकर विभाग, महसूल विभाग हे सत्ताधाऱयांना झुकते माप देत असल्याचे उघड झाले आहे, असे ही जैन म्हणाले.