शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार कधी करणार? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

राज्यपाल अभिभाषणात महायुती सरकारच्या कामकाजाबाबत अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत. मात्र, राज्यातील आर्थिक स्थिती पाहता ते फोल ठरण्याची शक्यता आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे का? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला आहे.

राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेचा बुधवारी शेवटचा दिवस होता. यावेळी चर्चेत सहभागी होत विजय वडेट्टीवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचा आरोप केला. राज्यपाल यांनी एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार, असे म्हणाले. मात्र, महाराष्ट्रावर 9 लाख कोटींचे कर्ज आहे. दुसरीकडे राज्यातील महिला, तरुणी गायब होत आहेत, याचा उल्लेखही राज्यपालांच्या भाषणात नव्हता, असे वडेट्टीवार म्हणाले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, अशी घोषणा महायुतीने जाहीरनाम्यात केली होती, अजूनही सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार हे सांगितलेले नाही. राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिलांना 2100 रुपये देणार असे आश्वासन दिले, पण अजूनही त्याच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता नाही. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत 28 टक्के वाढ झाली आहे. सामान्यांचे घरचे बजेट कोलमडले आहे, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली. लाडकी बहिणीचे पैसे बँकेने कर्जासाठी वळवल्याचे उदाहरण समोर आले आहे. अमरावतीमधील निर्मला चारपे यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. ते बँकेकडून परस्पर कर्जासाठी वळवण्यात आले. सरकारने मग जे नियम लावले, जीआर काढले त्याला काय अर्थ आहे, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.