
एक हात नसलेल्या आरोपीचा खंडणी मागणाऱ्या टोळीला उपयोग काय होणार, असे आश्चर्य व्यक्त करत उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. अनिकेत ठाकूर असे या आरोपीचे नाव आहे. ठाकूरला 2018 मध्ये अटक झाली. गेली साडेसहा वर्षे तो कोठडीत आहे. जामिनासाठी त्याने याचिका केली होती. न्या. मनीष पितळे यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्या. पितळे यांनी ठाकूरला 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. ठाकूरला डावा हात नाही. उजव्या हाताला काही बोटे नाहीत. अशा दिव्यांग माणसाचा टोळीला काय उपयोग होत असेल, अशी शंका न्यायालयाने व्यक्त केली.
काय आहे प्रकरण
सुरेश पुजारीच्या टोळीतील काही आरोपींविरोधात भिवंडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. खंडणीसाठी धमकावणे, हत्येचा प्रयत्न करणे यासह अन्य आरोप या आरोपींवर ठेवण्यात आले आहेत. यातील एका आरोपीसोबत ठाकूरने रत्नागिरी ते डोंबिवली प्रवास केला होता. केवळ या गुह्यासाठी ठाकूरला अटक झाली. याचे आरोपपत्र दाखल झाले, मात्र आरोप निश्चिती झालेली नाही. खटला सुरू झालेला नाही. त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी ठाकूरने याचिकेत केली होती.
न्यायालयाचे आदेश
खटला कधी सुरू होईल व संपेल याची शाश्वती नाही. अटक झाल्यापासून ठाकूर कोठडीत आहे. परिणामी त्याला जामीन मंजूर केला जात आहे. पुरव्यांशी छेडछाड करू नये. साक्षीदारांना धमकावू नये, असे आदेश न्यायालयाने ठाकूरला दिले आहेत.