
शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. या त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. दादा, क्या हुआ तेरा वादा? असा संवाल करत सपकाळ यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
निवडणुकीच्या प्रचारात व जाहिरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आदी अनेक आश्वासन दिले होते. मात्र 100 दिवसातच महायुतीच्या सरकारला याचा विसर पडला असून दादा क्या हुवा तेरा वादा असे सपकाळ म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका केली. तसेच मोदी सरकारवरही त्यांनी हल्लाबोल केला. मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले असून लघू, छोटे व मध्यम उद्योग देशोधडीला लागले. नोटबंदी व जीएसटी नंतर या व्यवसायाला अवकळा आली.
नोटबंदीमुळे काळा पैसा उघड झाला नसून जेवढ्या नोटा होत्या तेवढा आरबीआय मध्ये जमा झाल्या आहेत. पण नोटबंदीमुळे मध्यम व्यवसाय मोडीत निघाला आहे. मोदी सरकारच्या काळात श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरिब अधिक गरिब होत आहेत, गरिब व उपेक्षितांचा विचार झाला पाहिजे, छोट्या लघु उद्योगाला चालना मिळाली पाहिजे असेही सपकाळ म्हणाले.