महसूल कमाईत पश्चिम रेल्वे सुस्साट! एसी लोकलमधून 215 कोटींचे उत्पन्न; सरत्या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 4485 कोटी कमावले

मुंबईकरांचा लोकल प्रवास वेगवान आणि सुकर करण्यास प्राधान्य देणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने महसूल कमाईचा विक्रम नोंदवला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पश्चिम रेल्वेने तब्बल 4485 कोटी रुपयांचा व्यावसायिक महसूल मिळवला. एसी लोकलच्या फेऱ्यांमुळे महसुलात मोठी वाढ झाली. गेल्या वर्षभरात एसी लोकलमधून 4.65 कोटी प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून रेल्वेच्या उत्पन्नात 215 कोटींची भर पडली आहे.

उपनगरी रेल्वेच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये पश्चिम रेल्वेने प्रवासी सेवेत विशेष कामगिरी केली आहे. या मार्गावर प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. एकीकडे महानगरात मेट्रो सेवेचा विस्तार होत आहे. त्यामुळे लोकलची प्रवासीसंख्या कमी होण्याची चिन्हे होती. तथापि, पश्चिम रेल्वेने मेट्रोप्रमाणे एसी लोकलचा प्रवास उपलब्ध करून देत प्रवासी सेवेतून उत्पन्नवाढ कायम राखली. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने व्यावसायिक, प्रवासी, उपनगरीय सेवा, गैर-उपनगरीय सेवा, पीआरएस, एसी ईएमयू प्रवासी आणि महसूल, मालवाहतूक, पार्किंग आणि कॅटरिंग अशा विविध श्रेणींमध्ये सर्वोत्तम महसूल आकड्यांची नोंद केली आहे. विशेषतः एसी लोकलमुळे सरत्या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेच्या उत्पन्नाची गाडी सुस्साट धावली. एसी लोकलमधून प्रवास केलेल्या 4.65 कोटी प्रवाशांच्या तिकीट आणि पासमधून रेल्वेला 215 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

डिजिटल तिकीट, पीआरएस आधुनिकीकरण आणि गर्दी व्यवस्थापनामुळे प्रवाशांची सोय झाली आहे. पायाभूत सुविधा, मालवाहतुकीतील नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच स्थानकांचा विकास यामुळे पश्चिम रेल्वेचा प्रवास सुकर बनला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम उत्पन्नात दिसून आला आहे, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी (पश्चिम रेल्वे) विनीत अभिषेक यांनी सांगितले.