खूशखबर! पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नवी एसी लोकल

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक नवीकोरी एसी लोकल आली आहे. मंगळवारी रात्री विरार यार्डात नवीन एसी लोकल दाखल झाली असून आठवडाभर या लोकलची टेस्टिंग होणार आहे. त्यानंतर ही लोकल प्रवासी सेवेत दाखल होईल.

सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलच्या दिवसाला सुमारे 1406 फेऱया धावतात. नवीन एसी लोकलमुळे यात आणखी वाढ होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या नव्या लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या 10 ते 12 एसी सेवांमध्ये वाढ होणार आहे. चेन्नईच्या इंटिग्रल रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये ही लोकल तयार करण्यात आली आहे, मात्र ही गाडी जलद किंवा धिम्या मार्गावर चालवण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

मध्य रेल्वेलाही मिळाली लोकल

पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेला एक सामान्य लोकल मिळाली आहे. चौथा कॉरिडॉर असलेल्या बेलापूर-उरण मार्गिकेवर सुरू असलेल्या जुन्या लोकलच्या जागेवर धावणार आहे. 12 डब्यांची ही लोकल आहे. सध्या बेलापूर-उरण विभागात तीन रेट्रोफिटेड लोकल गाडय़ांचा वापर केला जातो. या तीन लोकलपैकी एक गाडी बदलून त्या जागी नवी लोकल चालवली जाणार आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गांसाठी नवीन उपनगरीय ट्रेन मिळाल्या असून यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.