पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव-कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून या कामासाठी शनिवारी रात्री 12 ते रविवारी सकाळी 10पर्यंत 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अनेक लोकल रद्द, तर काही लोकलच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 10.44 वाजता विरार-अंधेरी जलद वातानुकूलित लोकल बोरिवलीपर्यंत धावेल. रात्री 11ः55 वाजता अंधेरी-भाईंदर जलद वातानुकूलित लोकल रात्री 11.25 वाजता बोरिवलीवरून चालवण्यात येईल. रात्री 8.23ची दादर-बोरिवली लोकल, रात्री 10.24ची चर्चगेट-बोरिवली लोकल, सायंकाळी 7.11ची चर्चगेट-बोरिवली लोकल भाईंदरपर्यंत चालविण्यात येईल. रात्री 11.40ची विरार-अंधेरी लोकल भाईंदरपर्यंत चालवण्यात येईल. रात्री 12.16ची चर्चगेट-बोरिवली लोकल, रात्री 12.38 वाजेची चर्चगेट-बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येईल.