
वानखेडे स्टेडियमजवळील फूटओव्हर ब्रिजवर (एफओबी) मुख्य गर्डरचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री तीन तासांचा ब्लॉक घेतला आहे. रात्री 1.15 ते 4.15 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. मात्र या कामामुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा रविवारी सकाळीही लोकल वाहतुकीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. शनिवारी बोरिवलीहून रात्री 8.50 वाजता सुटणारी बोरिवली- चर्चगेट लोकल तसेच रविवार, 20 एप्रिल रोजी चर्चगेटवरून सकाळी 4.38 वाजता सुटणारी चर्चगेट-बोरिवली लोकल रद्द करण्यात आली आहे. तसेच काही लोकल मुंबई सेंट्रल- चर्चगेटदरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री 11.30 वाजता विरारवरून सुटणारी विरार-चर्चगेट लोकल वेळापत्रकानुसार 1.10 वाजता चर्चगेटला पोहोचेल. विरारहून चर्चगेटपर्यंत धावणारी ही शेवटची लोकल असेल.