फुकट्या प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वे मालामाल; सात महिन्यांत 93 कोटींची दंडवसुली

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने तब्बल 93 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेतून ही दंडवसुली करण्यात आली. विशेष म्हणजे 93 कोटी रुपयांपैकी 30 कोटी रुपये हे मुंबई उपनगरीय लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल केले आहेत.

योग्य तिकीट घेऊनच प्रवास करा, असे आवाहन रेल्वेकडून वारंवार प्रवाशांना करण्यात येते. तरीदेखील काही प्रवाशी तिकिटाशिवाय प्रवास करतात. अशा प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई उपनगरीय लोकल, मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन, हॉलिडे स्पेशल ट्रेनमध्ये केलेल्या तिकीट तपासणीत फुकट्या प्रवाशांकडून 93 कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली.

फुकटात गारेगार प्रवास करणाऱ्यांकडून 1 कोटी 31 लाखांची वसुली

अनेक प्रवाशी एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करतात. अशा प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून सरप्राईज तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एसी लोकलमधून फुकटात फिरणाऱ्या तब्बल 40 हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या दंडातून पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत 1 कोटी 31 लाख रुपये जमा झाले.