
पश्चिम रेल्वेवर शनिवारी दुपारपासून रविवारी रात्रीपर्यंत 35 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान गर्डरचे काम केले जाणार आहे. त्यासाठी लोकल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांत तब्बल 160 हून अधिक लोकल फेऱया रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे ‘विकेण्ड’ शेडय़ुल पूर्णपणे कोलमडून लोकल प्रवासात ‘मेगाहाल’ होण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम रेल्वेने शनिवारी, 26 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजल्यापासून रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत 35 तासांचा मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. या काळात लोकलच्या तब्बल 163 फेऱया रद्द करण्यात आल्या आहेत. शनिवारी 73 आणि रविवारी 90 लोकल फेऱया रद्द केल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. कांदिवली व बोरीवली स्थानकांदरम्यान असलेल्या पुलाच्या रिगर्डरिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी पाचवी मार्गिका, कारशेड लाईन आणि कांदिवली ट्राफिक यार्ड लाईनवर ब्लॉक घेण्यात आला आहे. याचा मोठा परिणाम लोकलच्या संपूर्ण वेळापत्रकावर होणार आहे. त्यामुळे विकेण्डला फिरण्यासाठी घराबाहेर पडणाऱया रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
मेल-एक्स्प्रेस गाड्या फास्ट लाईनवर धावणार
ब्लॉक काळात लोकलप्रमाणे मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पाचव्या लाईनवरून चालवण्यात येणाऱया लोकल आणि मेल-एक्स्प्रेस ट्रेनची वाहतूक फास्ट लाईनवरून वळवण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱया काही एक्स्प्रेसचा प्रवास वसई, भाईंदरपर्यंत समाप्त केला जाणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांचेही हाल होणार आहेत.
मध्य व हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर लाइनवर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. मुख्य मार्गावर विद्याविहार ते ठाणेदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 12.30 पर्यंत ब्लॉक असेल. तसेच हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान अप मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) वाशी, बेलापूर, पनवेलला जाणाऱया डाऊन मार्गावरील सेवा सकाळी 11.16 ते दुपारी 04.47 पर्यंत आणि सीएसएमटीहून वांद्रे, गोरेगावला जाणाऱया मार्गावरील लोकल वाहतूक सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 पर्यंत बंद असेल. तसेच पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीला जाणाऱया लोकल सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत आणि गोरेगाव, वांद्रे येथून सीएसएमटीला जाणाऱया लोकल सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 वाजेपर्यंत बंद राहतील. मुख्य मार्गावरही लोकलच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.