वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाचा कॅरेबियन तडका! 10 षटके निर्धाव टाकत दिल्या फक्त 5 धावा, उमेश यादवचा विक्रम मोडला

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजचा 23 वर्षीय गोलंदाज जॅडन सील्स याने कहर बरसवणारी गोलंदाजी करत बांगलादेशी फलंदाजांच्या बॅटीला चाप लावला. त्याने तब्बल 10 षटके निर्धाव टाकत फक्त 5 धावा दिल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचा विक्रम मोडला आहे.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना मैदानामध्ये जास्त वेळ टिकू दिले नाही. त्यामुळे बांगलादेशचा पहिला डाव फक्त 164 धावांमध्ये आटोपला. वेस्ट इंडिजकडून युवा गोलंदाज जॅडन सील्स याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने एकून 15.5 षटकांची गोलंदाजी केली असून यातील 10 षटके निर्धाव टाकली आहेत. तसेच 0.31 च्या सरासरीने पाच धावा देत चार विकेट घेतल्या. जेडनने लीटन दास, तस्कीन अहमद, मेहदी हसन आणि नाहिद राणा यांना आपल्या जाळ्यात अडकवत झटकीपट माघारी पाठवले. जेडनची 0.31 ही सरासरी कसोटी क्रिकेटमध्ये 1978 सालानंतरची सर्वोत्तम सरासरी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम उमेश यादवच्या नावावर होता. उमेश यादवने 2015 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 21 षटके टाकत 3 विकेट घेतल्या होत्या. तसेच 0.42 च्या सरासरीने फक्त 9 धावा दिल्या होत्या. मात्र, आता जॅडन सील्स याने उमेश यादवचा हा विक्रम मोडीत काढला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना जॅडन सील्स व्यतिरिक्त शमर जोसेफनेही जबरदस्त गोलंदाजी करत 3 विकेट घेतल्या. तसेच केमार रोच याने 2 विकेट घेतल्या. त्यामुळे बांगलादेशया पहिला डाव 164 धावांवर आटोपला आहे. वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसा अखेर ब्रॅथवेट 115 चेंडू 33 धावा आणि कार्टी 60 चेंडू 19 धावांवर फलंदाजी करत असून संघाने 1 विकेट गमावत 70 धावा केल्या आहेत.