जाकेर अलीच्या तडाखेबंद 91 धावांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने दुसऱ्या डावात 268 अशी दमदार मजल मारत यजमान वेस्ट इंडीजसमोर कसोटी विजयासाठी 287 धावांचे जबरदस्त आव्हान उभारले आहे. विंडीजने चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत 1 बाद 23 अशी मजल मारली आहे. पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजने बाजी मारली होती, तर दुसरी कसोटी जिंकून बांगलादेशला मालिका बरोबरीत सोडविण्याची नामी संधी आहे.
पहिल्या डावात बांगलादेशचा डाव 164 धावांत आटोपला होता. त्यानंतर नाहिद राणाने 61 धावांत 5 विकेट घेत विंडीजचा 146 धावांतच फडशा पाडत 18 धावांची माफक आघाडी घेतली होती. मग दुसऱ्या डावात त्यांनी जाकेर अलीसह शादमन इस्लाम (46) आणि कर्णधार मेहदी हसन मिराजच्या (42) खेळामुळे सर्वबाद 268 अशी धावसंख्या उभारत कसोटीवर आपली पकड मजबूत केली.