T20 Wc 2024 : वेस्ट इंडिजचा ‘सुपर-8’मध्ये प्रवेश; दुसऱ्या पराभवामुळे न्यूझीलंड बाहेर पडण्याच्या मार्गावर

दोन जूनपासून सुरू झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये अनेक मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. अमेरिका, अफगाणिस्तान या संघांनी बड्या संघांना धक्के दिले आहेत. त्यामुळे पाकिस्तानसह श्रीलंका, इंग्लंड आणि आता न्यूझीलंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना न्यूझीलंडने 13 धावांनी गमावला. या पराभवामुळे न्यूझीलंडच्या संघाला साखळी फेरीतून गाशा गुंडाळावा लागण्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ निर्धारित षटकांमध्ये 9 बाद 136 धावा करू शकला. ग्लेन फिलिप्स याने 40 धावांची खेळी करत संघर्ष केला. कर्णधार केन विलियम्स या लढतीतही फ्लॉप गेला. अवघी एक धाव करत तो माघारी परतला.

फिन अॅलेन याने 26, तर मिचेल सँटनर याने 21 धावांचे योगदान दिले. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजकडून अल्जारी जोसेफ याने सर्वाधिक 4, गुडाकेश मोटी याने 3, तर आंद्रे रसेल आणि अकील हुसैन यांनी प्रत्येकी एक विकेट घेत संघाला सुपर-8 मध्ये पोहोचवले.

तत्पूर्वी वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना शेरफन रुदरफोर्ड याच्या 68 धावांच्या वादळी खेळीच्या बळावर 149 धावांपर्यंत मजल मारली. त्याच्या व्यतिरिक्त वेस्ट इंडिजच्या इतर एकही फलंदाजाला 20 धावांचा आकडाही पार करता आला नाही. न्यूझीलंडकडून बोल्डने सर्वाधिक तीन, तर लॉकी फर्ग्यूसन आणि साऊथीने प्रत्येकी दोन आणि सँटनर, निशम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.