दापोलीत नव वर्षाच्या स्वागतासाठी तिखटाचा बेत; मटण खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

दापोलीत तिखटाचा बेत आखत अनेकांनी नव वर्षाचे स्वागत केले . त्यामुळे दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील मटण शॉपवर मटण खरेदीसाठी खवय्यांची गर्दी झाली होती.

काहीही खाण्याचा बेत असेल तर खवय्यांना निमित्त शोधावे लागत नाहि. ऋण काढतील पण सण साजरे करतील अशी प्रचलित म्हण आजही अमंलात येत असल्याचे दापोलीत दिसून येत आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोडापेक्षा तिखट बेताच्या अधिक पार्ट्या झाल्या तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला बुधवार हा खायचा वार आल्याने खवय्यांनी बुधवार वाराची संधी सोडली नाही. थर्टी फस्टच्या निमित्ताने दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी अगदी साधी मासळीही वाढलेल्या दरात विकत घेत असल्याने 25 डिसेंबर पासूनच अगदी 1 जानेवारी या नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत मासळीचा चांगलाच तुटवडा झाल्याचे भासत होते. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांना वाढत्या दरातही मासळी विकत घेता येत नव्हती. त्यामुळे खवय्यांनी नवीन वर्षाच्या शुभारंभाला गोडधोड शाकाहारीच्या बेतापेक्षा मांसाहार करण्याला पसंती दिली. त्यामुळे दापोली शहराला लागूनच असलेल्या गिम्हवणे येथील मटण शॉपवर सकाळ पासूनच मटण खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.