साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 25 ऑगस्ट ते शनिवार 31 ऑगस्ट 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – फसगत टाळा

मेषेच्या पराक्रमात मंगळ, सूर्य, चंद्र लाभयोग. अनेक कामे करून घेता येतील. गोड बोलून तुमचे गुपित काढून घेण्याचा प्रयत्न होईल. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात नुकसान, फसगत टाळा. भ्रमात राहू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील. डावपेच करताना गोपनीयता राखणे फार महत्त्वाचे राहील. जवळच्या व्यक्ती दगा देण्याचा प्रयत्न करतील.

शुभ दिनांक – 26, 27

वृषभ – योजना गतिमान होतील

वृषभेच्या धनेषात मंगळ, चंद्र बुध लाभयोग. प्रत्येक दिवस उत्साह, आत्मविश्वास वाढवणारा आहे. मेहनत घ्या. यश मिळवाल. नोकरीत बढती, बदली करण्याची संधी मिळेल. नव्या कामासंबंधी चर्चा सफल होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना गतिमान होतील. वरिष्ठ कार्याचे कौतुक करतील. लोकप्रियता वाढेल. स्पर्धेत यश मिळेल.

शुभ दिनांक – 28, 29

मिथुन – रागावर ताबा ठेवा

स्वराशीत मंगळ, सूर्य, चंद्र लाभयोग. क्षुल्लक अडचणींवर मात करून यश खेचून आणता येतील. ठरवाल ते करून दाखवाल. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. सावधपणे निर्णय घ्याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव, गैरसमज दूर सारून कामे करत रहा. पदाची आशा वाढेल. अनेक प्रकारचे सहकार्य घेता येईल.

शुभ दिनांक – 29, 30

कर्क – प्रवासात घाई नको

कर्केच्या व्ययेषात मंगळ, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. अहंकार व राग यामुळे अडचणी वाढतील. सौम्य धोरण फायद्याचे ठरेल. नोकरीत काम वाढले तरी प्रशंसा होईल. धंद्यात धावपळ होईल. प्रवासात घाई नको. आरोग्याची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परखड शब्द तणाव निर्माण करतील. वादाचे प्रसंग टाळा. वाटाघाटीत यश मिळेल.

शुभ दिनांक – 25, 26

सिंह – अहंकार नको

सिंहेच्या एकादशात मंगळ, चंद्र गुरू लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कठीण कामे करा. कोणत्याही चर्चेत अहंकार, कठोर शब्द नको. नोकरीत चातुर्य ठेवा. धंद्यात वाढ होईल. शब्दात फसू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव मिटवण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. मैत्रीत गैरसमज होतील. लोकप्रियता वाढेल.

शुभ दिनांक – 25, 26

कन्या – प्रतिष्ठा सांभाळा

कन्येच्या दशमेषात मंगळ, शुक्र, प्लुटो त्रिकोणयोग. उत्साह, आक्रमकता वाढेल. प्रतिष्ठा धोक्यात येईल. कायदा पाळा. नोकरीच्या कामात चूक होईल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सर्वांना समान समजू नका. कोणालाही तुमच्या मतानुसार वाकवता येईल अशा भ्रमात राहू नका. चर्चा करा. संयमाने मुद्दे मांडा.

शुभ दिनांक – 26, 27

तूळ – संयम बाळगा

तूळेच्या भाग्येषात मंगळ, सूर्य, चंद्र लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला धावपळ, ताण जाणवेल. मनाविरुद्ध कामे करावी लागतील. सहनशीलता, संयम जपा. नोकरीत अधिकारी थाटात वागू नका. धंद्यात फसगत टाळा. चतुराई वापरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणाच्याही आहारी न जाता कामे करा. प्रतिष्ठा मिळवा. व्यसनांपासून दूर रहा.

शुभ दिनांक – 28, 29

वृश्चिक – धंद्यात प्रगती साधाल

वृश्चिकेच्या अष्टमेषात मंगळ, शुक्र, नेपच्यून प्रतियुती. प्रवासात धोका पत्करू नका. संताप केल्यास अडचणी वाढतील. मधुरवाणी, चातुर्याने धंद्यात प्रगती साधाल. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच ठरवता येतील. चर्चेत यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. जनसंपर्क वाढेल.

शुभ दिनांक – 25, 31

धनु – शब्द जपून वापरा

धनुच्या सप्तमेषात मंगळ, सूर्य, चंद्र लाभयोग. क्षेत्र कोणतेही असो कौशल्याने यश मिळवा. राग वाढेल. तणाव वाढेल. नम्रता, सौजन्यामुळे सगळ्यांना जिंकता येईल. नोकरीत व्याप वाढेल. शब्द जपून वापरा. धंद्यात चर्चा नको. व्यवहारात सावध रहा. लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याच्या चौकटीत राहून मुद्दे मांडा. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल.

शुभ दिनांक – 25, 29

मकर – कोणालाही कमी लेखू नका

मकरेच्या षष्ठेशात मंगळ, चंद्र, बुध लाभयोग. क्षेत्र कोणतेही असो विरोधकांना कमी लेखू नका. खेळीमेळीच्या वातावरणाचा उपयोग केल्यास समस्या उग्ररूप धारण करणार नाहीत. नोकरीच्या कामात सावध रहा. धंद्यात नम्रपणे वागा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अरेरावी नको. इतरांच्या सांगण्यानुसार चुकीचा निर्णय घेऊ नका.

शुभ दिनांक – 25, 31

कुंभ – गैरसमज होतील

कुंभेच्या पंचमेषात मंगळ, सूर्य, चंद्र लाभयोग. मैत्रीत, नात्यात शाब्दिक चकमक, गैरसमज होतील. अहंकाराची भाषा तुमचा प्रभाव कमी करेल. नोकरीत इतरांच्या भरवशावर राहू नका. धंद्यात हिशेबात सावध रहा. मौल्यवान वस्तू जपा. फसगत होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. जवळच्या व्यक्ती धोका देण्याची शक्यता.

शुभ दिनांक – 28, 29

मीन – अतिरेक नको

मीनेच्या सुखस्थानात मंगळ, चंद्र, बुध लाभयोग. तुमच्या क्षेत्रात मेहनत, जिद्द यावर यश मिळवा. समतोल राखा. अतिरेक हानिकारक ठरेल. नोकरीत दगदग होईल. धंद्यात लाभ होईल. सहनशीलता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपमानकारक बोलणे टाळा. वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रतिष्ठा जपा. लोकप्रियता उपयोगी येईल.

शुभ दिनांक –  25, 26