
>> स्पायडरमॅन
परंपरा, सण, रीतीभाती आणि अनेक धर्मांनी संस्कृत देश म्हणून जगभरात हिंदुस्थानची ओळख आहे. आपल्या देशात सणासमारंभासाठी अनेक चित्रविचित्र प्रथा पाळल्या जातात, ज्या गेली अनेक वर्षे रूढ आहेत. आपल्या देशाच्या विविध राज्यांतल्या अनोख्या प्रथा आपण चवीने वाचत असतो, पण आपल्या महाराष्ट्रातली एक प्रथा सध्या सोशल मीडियावर गाजत आहे आणि ती म्हणजे सासरच्या गावात गाढवावर बसून जावयाची मिरवणूक काढणे. ही प्रथा सध्या प्रचंड चर्चेत असून याबद्दल खूप सारी चर्चादेखील चालू आहे. कारण ही प्रथा ज्या दिवशी पाळली जाते, तो होळीचा दिवस असतो..
बीड जिल्हा सध्या काही वेगळ्या कारणाने गाजतो आहे. मात्र या जिह्यातील केज तालुक्यातील विडा गावात ही परंपरा पाळली जात असल्याची चर्चा सोशल मीडिया आणि विविध वर्तमानपत्रांच्या वेब साइटवरदेखील देण्यात आलेली आहे, ही प्रथा गेली 90 वर्षे पाळली जात आहे हे विशेष आहे. या प्रथेमध्ये गावात सर्वात नवा जावई शोधला जातो. अर्थात नुकताच ज्याचा विवाह गावातल्या मुलीशी झाला आहे असा नवरदेव शोधला जातो. या शोधाला तीन ते चार दिवस लागतात.
एकदा का सर्वात नवा जावई सापडला की, मग त्याला त्याच्या आवडीचे कपडे घेऊन दिले जातात. हे नवे कपडे घालून सजलेल्या जावयाला मग गाढवावरून फिरवले जाते. यापूर्वी जावयाला लाल रंगदेखील लावला जातो. ही परंपरा पाहण्यासाठी जवळचे आणि लांबचे अनेक लोक हजेरी लावत असतात. असे सांगतात की, ही परंपरा 90 वर्षांपूर्वी या गावातील देशमुखांच्या घरात सुरू झाली. जावयाने होळीला रंग लावून घेण्यास नकार दिला आणि शेवटी सासरेबुवांनी जावयाला रंगासाठी तयार केले. त्यानंतर मग एक सजवलेले गाढव मागविण्यात आले आणि रंग लावून जावयाची वरात काढण्यात आली. ही प्रथा तेव्हा जी चालू झाली, ती आजही गावात चालू आहे.