वेब न्यूज – भुतांचे बेट

>> स्पायडरमॅन

अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील सेंटिनल या बेटावर अनधिकृतरीत्या प्रवेश केल्याबद्दल नुकतीच अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक करण्यात आली आणि हा चर्चेचा विषय झाला. या बेटावर राहणाऱया आदिवासींना बाहेरील कोणताही संपर्क नको आहे. इथे प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱया प्रत्येक व्यक्तीची हत्या करून त्यांनी जणू तसा संदेश दिला आहे. आदिवासी समूहाच्या जीवनशैलीचा सन्मान ठेवून सरकारनेदेखील या बेटावर प्रवेश करण्यास प्रतिबंध घातलेला आहे. या बातमीची चर्चा सुरू असताना गेल्या 55 वर्षांपासून ओसाड पडलेल्या इटलीतील पोवेग्लिया बेटाबद्दलदेखील रंजक माहिती समोर येऊ लागलेली आहे.

इटलीच्या उत्तरेला व्हेनिस आणि लिडो यांच्या मध्ये हे छोटेसे बेट वसलेले आहे. इथे सरकारी परवानगीशिवाय प्रवेश अशक्य आहे. पूर्वीच्या काळी इथे गेलेला माणूस पुन्हा कधी परत आला नाही असे मानले जात असे. या बेटाला झपाटलेले बेट किंवा भुतांचे बेट म्हणून ओळखले जाते. 1 लाख 60 हजार लोकांना इथे जिवंत जाळण्यात आले होते. या बेटावरील मातीपैकी अर्धी माती ही या जाळलेल्या शवांची राख आहे असे काही लोक सांगतात. 1968 साली तत्कालीन सरकारने या बेटाला पूर्ण रिकामे केले आणि तेव्हापासून हे बेट ओसाड पडलेले आहे. 1776 च्या काळात व्हेनिस शहरात येणारे प्रवासी, व्यापारी जहाजे यांच्यासाठी हे बेट म्हणजे एक चेक पॉइंट होते. मात्र काही काळानंतर या बेटावर आलेल्या दोन जहाजांवर प्लेग आणि त्या काळी ब्लॉक डेथ (काळा ताप) म्हणून ओळखल्या जाणाऱया आजाराचे काही रुग्ण सापडले आणि खळबळ उडाली. या आजारावर त्या वेळी कोणताही उपाय अस्तित्वात नव्हता. 1793 ते 1814 या काळात हे बेट क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात आले. सर्व प्रयत्न करूनदेखील आजाराची साथ वाढत आहे हे लक्षात आल्यावर या बेटावर हलवण्यात आलेल्या सर्व रुग्णांना जिवंत जाळण्यात आले. 1922 साली इथे एक मेंटल हॉस्पिटल उभारण्यात आले होते. मात्र अनेक विचित्र प्रसंगांच्या मालिकेनंतर तेदेखील बंद करण्यात आले.