
>> स्पायडरमॅन
जगाच्या काही प्रमुख देशांमध्ये युद्धाचे वादळ घोंघावत असताना जुन्या युद्धासंबंधी किंवा लक्षणीय अशा काही हल्ल्यांविषयी माध्यमांमध्ये चर्चा झडणे ओघाने आलेच. युद्ध हा अंतिम पर्याय असला तरी अनेकदा गुप्त हल्ला, सर्जिकल स्ट्राईक यांच्या मदतीने काही देशांनी मोठे यश मिळवले आहे. इस्रायलची मोसाद ही गुप्तचर संघटना या कामात जगप्रसिद्ध आहे. कोणतेही काम चलाखीने आणि अत्यंत सावधपणे तडीस नेणारी ही संघटना 1980 च्या काळात पाकिस्तानचा अणू कार्यक्रम उधळून लावण्यासाठी सज्ज झाली होती असा दावा काही माध्यमांनी केला आहे. इस्रायलच्या निर्मितीनंतर त्याचे कोणत्याच मुस्लिम देशाशी फारसे चांगले संबंध नव्हते. आजदेखील त्यात काही फार सुधारणा झाली आहे असे नाही. अनेक देशांनी इस्रायलच्या निर्मितीला मान्यता दिली नाही. पाकिस्तानदेखील त्यापैकी एक देश. 1980 च्या सुमारास पाकिस्तान अणुबॉम्ब बनवण्याच्या वेडाने झपाटलेला होता. झिया उल हक आणि झुल्फिकार अली भुट्टो हे अणुबॉम्ब म्हणजे मुस्लिम देशांमध्ये आपली पत वाढवण्याचे साधन मानत होते. मात्र दुसरीकडे त्यांच्या या प्रयत्नांकडे इस्रायल मात्र इस्लामी बॉम्ब म्हणून बघत होते. एखादा मुस्लिम देश अण्वस्त्राने सज्ज होणे हा आपल्यासाठी धोका आहे असे इस्रायलला वाटत होते. काही लोक असादेखील दावा करतात, पाकिस्तान अण्वस्त्राने सज्ज होणे हे हिंदुस्थानसाठीदेखील प्रचंड धोकादायक होते. या अण्वस्त्राची पहिली झेप दिल्ली असेल अशी भीती हिंदुस्थानच्या अनेक धोरणी लोकांना पडली होती. पाकिस्तान ज्या ठिकाणी हा कार्यक्रम राबवत होता, त्या ठिकाणी अचानक हवाई हल्ले करून त्या प्रयोगशाळेला नष्ट करून टाकायचे असे इस्रायलने ठरवले होते आणि त्यासाठी हिंदुस्थानला मदत करण्याची तयारीदेखील दाखवली होती. प्रत्यक्षात मात्र असे काही घडले नाही. मात्र या मदतीच्या हाताची चर्चा खूप वर्षांपासून सुरू आहे आणि अनेक लोक त्याबद्दल विविध दावे करत असतात व समकालीन वर्तमानपत्रातील लेखांचे दाखले देत असतात.