वेब न्यूज – खजिना

>> स्पायडरमॅन

‘अमक्या तमक्या देशाला सापडला अब्जावधींचा खजिना’ या प्रकारातल्या बातम्या आपण अनेकदा वाचत किंवा ऐकत असतो. एखाद्या देशाला सापडणारे असे खजिने म्हणजे शक्यतो नैसर्गिक वायूचा साठा किंवा खनिज पदार्थ अशा स्वरूपात असतात. मात्र जगात पुरातन काळापासून असे अनेक खजिने आहेत की, ज्यांचा शोध आजही केला जात आहे. अनेक लोक या शोधकार्यात मृत्युमुखी पडले. मात्र ना या खजिन्यांबद्दलची उत्सुकता कमी झाली ना त्यांच्या प्राप्तीचा ध्यास कमी झाला.

फ्रान्सचे रहिवासी असलेले पियरे आणि लॅफिट हे दोन भाऊ समुद्री चाचे होते. मेक्सिकोच्या खाडीतून प्रवास करणाऱया व्यापारी जहाजांना लुटणे हा त्यांचा आवडता उद्योग. या दोघांनी त्या काळात प्रचंड प्रमाणात लूट मिळवली होती. सन 1823 ते 1830 च्या मधल्या काळात कधीतरी लॅफिट मृत्युमुखी पडला आणि त्याचा खजिनादेखील नाहीसा झाला. या लुटीबद्दल खूप अफवा पसरल्या होत्या. न्यू ऑर्लियन्सच्या तटावर कुठेतरी आजही हा खजिना पुरला असल्याची वदंता आहे.

रशियाच्या कॅथरिन पॅलेसमध्ये असलेल्या एका खोलीला ‘द अंबर रूम’ म्हणून ओळखले जात असे. अंबर रत्नांनी आणि सोने, चांदी, हिऱयांनी हे पूर्ण दालन सजवलेले होते. त्याच्या भिंती पूर्ण सोन्याने मढवलेल्या होत्या. अत्यंत मौल्यवान अशी रत्ने, आभूषणे, दुर्मिळ कलाकृती, विविध धातूंचे पुतळे, भव्य आरसे अशा अनेक गोष्टी इथे जमा करण्यात आल्या होत्या. काही लोक याला जगातले आठवे आश्चर्यदेखील म्हणत असत. मात्र 1941 साली या महालावर नाझी सैन्याचा कब्जा झाला आणि हे दालन अक्षरशः अदृश्य झाले. नाझी सैन्याने त्याची लूट केली असे मानले जाते. मात्र आजही हा खजिना कुठे आहे याची कोणालाही कल्पना नाही.

मंगोल प्रशासक चंगेझ खान यानेदेखील संपूर्ण जगात लूटमार करत प्रचंड अशी धनदौलत कमावली होती. अत्यंत मौल्यवान असा हा खजिनादेखील अदृश्य झालेला आहे. जगभरात अनेक लोक हा खजिना शोधण्यासाठी मोहिमा आखत असतात.