वेब न्यूज – नागरिकत्वाची कथा

>> स्पायडरमॅन

कधी उज्ज्वल भवितव्यासाठी, नशीब अजमावण्यासाठी, तर कधी सुरक्षेच्या कारणावरून लोक इतर देशांत आश्रय घेत असतात. सध्या अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून ‘नागरिकत्व’ हा विषय ऐरणीवर आलेला आहे. या चर्चेत अशा काही देशांची नावे समोर आली आहेत, जिथे इतर देशांतून आलेल्या लोकांना नागरिकत्व मिळवण्यासाठी फार कसरत करावी लागते आणि अनेक वर्षांचा कालावधी घालवावा लागतो. व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात छोटा देश मानला जातो. 2019 च्या जनगणनेनुसार तेव्हा तिथे फक्त 825 लोकांचे वास्तव्य होते. या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी तुम्ही व्हॅटिकन सिटी अथवा रोममध्ये कार्डिनल असणे गरजेचे आहे. तिथे राहून कॅथलिक चर्चसाठी तुम्ही कार्य करत असाल तरीदेखील इथे नागरिकत्व मिळू शकते. स्वित्झर्लंडमध्ये नागरिकत्व मिळवण्यासाठी तुम्ही तिथे दहा वर्षांचा कालावधी घालवलेला असणे गरजेचा आहे आणि तुमच्याकडे वर्क परमिट असणे अत्यावश्यक आहे, तर युरोपियन युनियन, अमेरिका आणि कॅनडाच्या रहिवाशांना नागरिकत्वासाठी इथे पाच वर्षे घालवणे आवश्यक आहे. चीनचे नागरिकत्व मिळवणे हे महाकठीण काम समजले जाते. चीनचे नागरिकत्व मिळवण्यासाठी तुमचा कोणी एक नातेवाईक चीनचा रहिवासी असणे गरजेचे आहे. तसे नसल्यास नागरिकत्व मिळणे अवघड आहे. तसेच एकदा चीनचे नागरिकत्व मिळाले की, तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या देशाचे नागरिकत्व सोडणे आवश्यक आहे. जपानमध्ये नागरिकत्व मिळवण्यासाठी एका मोठय़ा कागदी कामकाजातून जावे लागते. यासाठी 6 ते 12 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. जपानमध्ये नागरिकत्वासाठी तिथे पाच वर्षांचा कालावधी घालवणे आवश्यक असून नागरिकत्वासाठी न्याय मंत्र्यांची अनुमतीदेखील मिळवावी लागते. भूतानमध्ये नागरिकत्व मिळवण्यासाठी माता आणि पिता हे दोघेही तिथले नागरिक असणे आवश्यक आहे. जर त्यांच्यापैकी फक्त एकजण नागरिक असल्यास तुम्हाला नागरिकत्वाचा अर्ज करण्यासाठी तिथे 15 वर्षे वास्तव्य करणे आवश्यक आहे.