आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अडकून पडलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्याची मोहीम पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली आहे. त्या दोघांना परत आणण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने मोहिमेची आखणी केली जात आहे. अंतराळवीरांना त्यासाठी खास प्रशिक्षण घ्यावे लागते.
1969 साली मानवाने अवकाशात झेप घेण्यापूर्वी अवकाशातील वातावरण मानवासाठी अनुकूल आहे का नाही, तिथली परिस्थिती व हवामान याचा सजीवावर काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेण्यासाठी काही प्राण्यांना अंतराळात पाठवण्यात आले होते. अंतराळात पाठवण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये कासव, माकड, चिंपांझी, मांजर अशा प्राण्यांचा समावेश होता. सर्वात प्रथम 1957 साली लाइका नावाच्या रशियन कुत्र्याला स्पुटनिक 2 या अंतराळ मोहिमेने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारा पहिला प्राणी बनवले. पाठोपाठ 1959 साली अल्बर्ट 2 नावाच्या माकडाने अमेरिकेच्या व्ही-2 या यानाच्या मदतीने अंतराळ प्रवास केला. या मोहिमेचा अंतराळातील वातावरण समजून घेण्यासाठी प्रचंड उपयोग झाला. 1960 साल हे या प्रवासातले अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरले. पुन्हा एकदा बेल्का आणि स्ट्रेलका ही रशियन कुत्री अंतराळात झेपावली व पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून सुखरूप पृथ्वीवर परतलीदेखील. अंतराळ मोहीम पूर्ण करून जिवंत परतणारे ते पहिले प्राणी ठरले. 1961 साली मर्क्युरी रेडस्टोन 2 या मोहिमेंतर्गत हॅम या पहिल्या चिंपांझीने अंतराळ सफर केली. अंतराळ मोहिमेसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलेला हॅम हा पहिला चिंपांझी होय. पुढे 1963 मध्ये फ्रान्सने एका मांजरीला अंतराळ सफर घडवली, तर 1968 साली सोव्हिएत युनियनच्या दोन कासवांनी अंतराळात उड्डाण केले. या कासवांच्या सोबत काही वनस्पती आणि माशींची अंडीदेखील पाठवण्यात आली होती.