समाज माध्यमांवर विविध विषयांवरच्या चर्चा कायम ज्ञानात भर घालत असतात. सध्या देशात अनेक मोठय़ा केस माध्यमांतून गाजत आहेत. हिट ऍण्ड रनसारख्या गंभीर विषयावरच्या केसमध्ये सामान्य नागरिकदेखील लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात चर्चा सुरू असताना देशामधल्या काही वेगळय़ा विषयावरच्या कायद्यांची चर्चा सुरू झाली. यामध्ये एक रंजक प्रश्न पुढे आला की, दोन देशांतील विमान प्रवासादरम्यान एखाद्या बाळाचा जन्म झाल्यास त्या नवजात अर्भकाला कोणत्या देशाचे नागरिकत्व मिळते? महत्त्वाचे म्हणजे हिंदुस्थानात यासंदर्भात कायदा काय सांगतो?
विविध देशांत यासंदर्भात वेगवेगळे कायदे आहेत. कायदेविषयक तज्ञांनी हे प्रामुख्याने विशद केले की, हिंदुस्थानात सात महिने किंवा त्याहून अधिक वयाच्या गर्भवती महिलांसाठी विमान प्रवासावर बंदी आहे, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत त्यांना परवानगी मिळू शकते आणि त्या विमानाने प्रवास करू शकतात. समजा एखाद्या महिलेने हिंदुस्थानहून ब्रिटनला जात असताना विमानात मुलाला जन्म दिला, तर अशा वेळी त्या मुलाच्या जन्माची वेळ आणि त्या वेळी विमान कोणत्या देशाच्या हद्दीत उडत होते याची तपासणी केली जाते. योग्य त्या देशाच्या विमान प्राधिकरणाकडून या मुलाच्या जन्माच्या संदर्भातील पुरावा कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातात. या उलट समजा बांगलादेशातून अमेरिकेला जाणाऱया विमानात एखाद्या महिलेने मुलाला जन्म दिला आणि त्या वेळी हे विमान हिंदुस्थानी हद्दीत उडत असेल, तर त्या मुलाचे जन्मस्थान हे हिंदुस्थान मानले जाईल आणि त्याला या देशाचे नागरिकत्व मिळू शकेल. विशेष म्हणजे विमानात जन्माला आलेल्या मुलाला आपल्या माता-पित्याचे राष्ट्रीयत्व प्राप्त करण्याचादेखील अधिकार असतो. हे मूल हिंदुस्थान वा बांगलादेश असे दुहेरी नागरिकत्व मिळवू शकते, पण दुर्दैवाने सध्या तरी हिंदुस्थानात दुहेरी नागरिकत्वावर बंदी आहे.