वेब न्यूज – एरिया 51

>> स्पायडरमॅन

जगभरात सर्वात जास्त चर्चा जर कशाची होत असेल तर ती एरिया 51 ची असे म्हणायला हरकत नाही. अमेरिकेच्या नेवाडात वाळवंटाच्या मध्ये असलेल्या भू भागाला एरिया 51 असे म्हटले जाते. अधिकृतपणे हे अमेरिकेचे लष्करी चाचणी स्थळ किंवा हवाई सुविधा पेंद्र म्हणून ओळखले जात असले तरी जगभरातील अनेक लोक इथे अमेरिका गुप्तपणे एलियन्सचा अभ्यास करते असा दावा करतात. काही लोकांनी यासंदर्भात लेखनदेखील केले आहे. सध्या या लष्करी स्थळावर एक उंच काळा टॉवर दिसल्याने हा भाग पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आलेला आहे. हा टॉवर एलियन तंत्रज्ञानाने उभारला आहे, हे एक एलियन्सचे यान आहे, ही नवी प्रयोगशाळा आहे असे विविध अंदाज यासंदर्भात व्यक्त केले जात आहेत.

एका सोशल मीडिया युजरने गुगल मॅपवर हा त्रिकोणी आकाराचा टॉवर पाहिला आणि त्याने ही गोष्ट पोस्टद्वारे प्रसारित केली. त्याने गुगल मॅपचा अचूक पत्ता 37O14’46.5″N 115O49’24.0″W देखील त्यात दिला आणि जगभरातून लोक गुगल मॅपवर धावले. अनेकांनी त्याची खात्री केली आणि त्यावर एकच चर्चा सुरू झाली. काही काळापूर्वी अमेरिकेच्या दोन नौदल आणि एक माजी लष्करी अधिकाऱयाने एलियन्सच्या संदर्भात काही धक्कादायक खुलासे केले होते. 1930 साली अमेरिकेच्या हाती एक अनोखे तंत्रज्ञान लागले असून शास्त्रज्ञ त्यावर रिव्हर्स इंजिनीअरिंगचे प्रयोग करत असल्याचा दावादेखील त्यांनी केला होता. एरिया 51 संदर्भात विविध दावे केले जात असण्यामागेदेखील काही कारणे आहेत. हा भाग पूर्णपणे बंदिस्त ठेवण्यात आला आहे. मोजके अधिकारी सोडले, तर इथे इतर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. 24 तास बंदोबस्त आणि निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या या भागावरून विमानांना उडण्याचीदेखील परवानगी नाकारण्यात आलेली आहे. अशा या गूढ भागात नवे काय घडते आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.