>> स्पायडरमॅन
इस्रायलची आयरन डोम ही सुरक्षा प्रणाली जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रणालीचा प्रभावी वापर करून इस्रायलने कायम आपल्या हजारो नागरिकांचे रक्षण केले. आता अमेरिकादेखील आपल्या देशवासीयांच्या सुरक्षेसाठी ही प्रणाली अमेरिकेत बनवणार आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनांनुसार त्याची त्वरेने पूर्तता करण्याच्या प्रयत्नात आहेत. अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करणे आणि नागरी वस्त्यांचे हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करणे हे या प्रणालीचे प्रमुख उद्दिष्ट असेल. आयरन डोम ही सुरक्षा प्रणाली खास करून छोटय़ा मिसाईल्सच्या हल्ल्यापासून बचावासाठी उपयोगात आणली जाते. या यंत्रणेला राफेल ऍडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टम आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीने संयुक्तपणे विकसित केले आहे. अत्यंत आधुनिक असे तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आलेली आयरन डोम यंत्रणा तिच्या दिशेने येणाऱया मिसाईलची वेगाने ओळख पटवते. त्यानंतर या मिसाईलची दिशा आणि वेगाचा अंदाज घेत नागरी वस्तीला त्यापासून कितपत धोका आहे याचा त्वरेने अंदाज लावते. असा काही धोका आढळल्यास ही यंत्रणा त्वरेने इंटरसेप्टर मिसाईल सोडते, जे समोरून येणाऱया मिसाईलला हवेतच नष्ट करते. 2023 मध्ये हमास आणि इस्रायलमध्ये झालेल्या संघर्षात आणि 2024च्या इराणविरोधी युद्धात या यंत्रणेची खरी ताकद जगासमोर आली. अमेरिकेची पुढच्या पिढीतील आयरन ड्रोन प्रणाली ही अधिक उन्नत असेल आणि बॅलिस्टिक, हायपरसोनिक, ऍडव्हान्स क्रूझ मिसाईल यांच्यापासून आणि इतर हवाई हल्ल्यांपासून सुरक्षा प्रदान करेल. गेल्या काही काळात अमेरिकेवर कोणत्याही देशाकडून असा हल्ला झालेला नसला तरी सध्याची होमलॅंड मिसाईल सुरक्षा नीती फारशी परिणामकारक नसल्याचे ट्रम्प यांचे मत आहे आणि त्यासाठी त्यांनी आता पूर्णपणे अमेरिकेत विकसित केल्या जाणाऱया या यंत्रणेची घोषणा केली आहे.