मुंबई शहर व उपनगरांतील प्रदूषणाने महिनाभर मुंबईकरांची दमछाक केली. या गंभीर परिस्थितीची दखल घेत उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणांनी ठोस पावले उचलली. परिणामी, शहरातील हवा काहीशी सुधारली. मात्र हवेचा दर्जा ‘समाधानकारक’ श्रेणीत पोहोचलेला नाही. याचदरम्यान मुंबईत आठवडाभर उष्णतेची लाट धडकणार असून तापमान 35 अंशांवर जाणार आहे.
उच्च न्यायालयाच्या सक्त आदेशानंतर महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस पावले उचलली आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही (एमपीसीबी) ऑक्टिव्ह मोडवर आले आहे. बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी कठोर निर्बंध लागू केल्यानंतर शहर व उपनगरांतील हवेचा दर्जा काहीसा सुधारला आहे. बुधवारी शहरातील हवा काहीशी सुधारली होती. सर्वच विभागांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 101 ते 200 अंकांच्या घरात होता. संपूर्ण शहराचा एक्यूआय सरासरी 162 अंकांच्या पातळीवर नोंद झाला. सकाळी धुरके पसरले होते. त्यातच तापमानात अचानक चार अंशांची वाढ झाली. याचा रुग्ण आणि वृद्ध मंडळींना प्रचंड त्रास झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांताक्रुझचा पारा पुढील आठवडाभर 35 अंशांच्या कमाल पातळीवर राहणार आहे, तर किमान तापमान 20 अंशांच्या पुढे नोंद होणार आहे.