देशभरात तब्बल 10 राज्यांमध्ये सध्या धुके असून पुढील 48 तास एकूण 14 राज्यांमध्ये धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. तर राजस्थानात पुन्हा एकदा हवामानात आश्चर्यजनक बदल झाला असून दिवसाच्या तापमानात घट झाली आहे. त्यामुळे राजस्थानात पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा तुफान बर्फवृष्टी सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळी परिस्थिती दिसत आहे. मध्य प्रदेशात सकाळी आणि रात्री कडक्याची थंडी पडत असून दिवसा प्रचंड उनाचा तडाखा जाणवत आहे. जम्मू कश्मीरच्या डोंगराळ भागात पुन्हा बर्फवृष्टी सुरू झाली आहे. लडाखच्या काही भागात पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे.
अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी
देशात अनेक भागात कडाक्याची थंडी पडल्याचे चित्र आहे. 3 फेब्रुवारीपासून राजस्थानात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रीय झाल्याने 2 आणि 4 फेब्रुवारी रोजी काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात जयपूर, सीकर, अलवरमध्ये हवामानातील बदलामुळे दुपारी हलके थंड वारे वाहू लागले आणि थंडी वाढली.
मध्य प्रदेशात दिवसा घामाच्या धारा
मध्य प्रदेशात सकाळी आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवत आहे. तर दिवसभर अंगातून अक्षरशः घामाच्या धारा निघत आहेत. अनेक भागात तापमान 32 अंशाच्या पुढे गेले आहे. तर हरयाणात हवामानात प्रचंड वेगाने बदल होत असून अनेक भागात आज दाट धुके होते. पंजाबमध्येही दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या 24 तासात येथे नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे. छत्तीसगडमध्ये दिवसा आणि रात्री हलकी थंड जाणवत आहे.