मुंबई, ठाण्यासह पालघर आणि रायगडला आज रेड अलर्ट; हवामान विभागाचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाण्यात मंगळवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाने मुंबईसाठी पाणीपुरवठा करणारी धरणं आणि तलाव भरत आहेत. तर दुसरीकडे मुसळधार पावसाने मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे 20 ते 25 मिनिटं उशिराने तर हार्बर रेल्वेवरील वाहतूक जवळपास 15 मिनिटाने सुरू आहे.

हवामान खात्याने मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि सर्व महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. या अनुषंगाने शाळा सोडताना शिक्षकांनी संबंधित पालक प्रतिनिधी यांना कळवून व आवश्यक ती खबरदारी घेत शाळांच्या स्तरावर योग्य तो समन्वय साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

उल्हास नदी धोक्याच्या पातळीजवळ

हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. आणि आज रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर उद्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे आज आणि उद्या असे दोन दिवस मुंबई, ठाण्यासर पालघर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्या पावसाचे धुमशान सुरूच राहणार आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी धोक्याच्या पातळीजवळ आहे. यामुळे उल्हास नदी काठच्या गावांना आणि कल्याणमधील परिसरांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, रायगड आणि पालघरमधील नद्यांनाही पूर आलेला आहे.

मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे. त्यासोबतच पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही पाऊस सुरू आहे. पुण्यात खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्याने मुठा नदीला पूर आला आहे. तर कोल्हापूरमध्ये पंचगंगा आणि सांगलीत कृष्णा नदीला पूर आला आहे. कोल्हापूरमध्ये राधानगरी धरण भरले असून कुठल्याही क्षणी स्वयंचलीत दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.