हिंदुस्थानला महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्कांचे, अधिकारांचे रक्षण करणारे संविधान दिले आहे. आपल्याकडे आदर्श आणि सर्वोत्तम संविधान आहे. मात्र आपण संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा योग्य तो आदर ठेवला नाही. तसेच संविधान रक्षणाची जबाबादारी असलेल्यांकडूनही संविधान रक्षणासाठी योग्य ती पावले उचलली गेली नाहीत, असे परखड मत माजी न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी व्यक्त केले. भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार करन थापर यांनी माजी न्यायमूर्ती मदन लोकूर यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. द वायरसाठी करण थापर यांना दिलेल्या 40 मिनिटांच्या मुलाखतीत, लोकूर यांनी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या वर्तनाबद्दल आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्तनाबद्दल भाष्य केले.
यावेळी मदन लोकूर म्हणाले की, आम्ही केवळ संविधानाचा अनादर केला असे नाही तर आम्ही डॉ. आंबेडकरांच्या आदर्श विचारांपासूनही दूर जात आहोत. आपल्या देशाकडे आदर्श आणि सर्वोत्तम संविधान आहे. मात्र, अनेकदा राजकारणी, न्यायाधीश आणि संसदेच्या सदस्यांकडून संविधानाची अवहलेना किंवा त्यात बदल, सुधारणा करण्याच्या नावाखाली संविधान बदलण्याचे प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. तसेच संविधान रक्षणाची जबाबदारी असलेल्यांही संविधान रक्षणासाठी योग्य ती पावले उचचली नाहीत. तसेच जनतेतही याबाबत योग्य ती जागृती झालेली नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
न्यायमूर्ती लोकूर यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांनी कोणताही गडबड किंवा वाद होणार नाही, एवढे स्पष्ट आणि कालसुंसगत संविधान आपल्याला दिले आहे. देशातील जनतेने हे संविधान योग्यरित्या वापरले आणि ते आत्मसात केले तर त्यांच्यासाठी ते वरदान ठरू शकते, असेही लोकूर म्हणाले. संविधानाचा गैरवापर झाल्यास त्याचे विपरीत परिमाम होऊ शकतात, या विचाराकडेही आपण लक्ष देण्याची गरज आहे, असेही लोकूर म्हणाले.