‘आम्ही मुली सुरक्षित नाही, आम्हाला भयमुक्त जगू द्या’ गडहिंग्लजमध्ये विद्यार्थिनींनी काढला मूक मोर्चा

गडहिंग्लजमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शहरातील सर्व शाळांच्या मुला-मुलींनी मूक मोर्चा काढत संतप्त भावना व्यक्त केल्या. अत्याचार करणारा नराधम शहजाद शेख याला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली. या वेळी ‘आम्ही मुली सुरक्षित नाही आहोत, आम्हाला भयमुक्त जगू द्या,’ असे फलक हाती घेत विद्यार्थिनींनी भावना व्यक्त केल्या.

चार दिवसांपूर्वी गडहिंग्लजमधील अल्पवयीन मुलीचा परप्रांतीय तरुणाकडून विनयभंग झाल्याची घटना समोर आली होती. याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांनी एकत्रित येत पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडून दुकान मालकासह त्या कामगाराला अटक करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अखेर दुकान मालकाला ताब्यात घेत दोघांवर गुन्हा दाखल केला होता. फरार असलेला नराधम शहजाद शेख याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती.

नराधमाने तिला व कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडित मुलीने घाबरून सत्य सांगितले नव्हते. शनिवारी गडहिंग्लजकरांनी धीर दिल्यानंतर पीडितेने घडला प्रकार सांगितल्याने धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे शहरात संतापाची लाट पसरली. रविवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी गडहिंग्लज बंदची हाक देत मोर्चा काढला होता.

आज शहरातील सर्व शाळांच्या मुला-मुलींनी या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढत आपल्या भावना व्यक्त केल्या. नराधम शहजाद शेख याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. हातात निषेधाचे फलक व काळे झेंडे घेऊन हा मूक मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला.