अदानी समूहाची दादागिरी आम्ही मोडून काढली, वांद्रेमधील तोडक कारवाईला आदित्य ठाकरे यांचा विरोध

>> सतिश केंगार

अदानी समूहाची दादागिरी आम्ही मोडून काढली. हेच चित्र आज आपण मुंबईकर आणि मराठी माणूस म्हणून रोखलं नाही तर, अदानी प्रत्येकाच्या घरावर बुलडोझर घेऊन येईल, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आज वांद्रे पूर्व येथील भारतनगर रहिवाशांना कुठलीही नोटीस न देता घरांवर हातोडा उगारणाऱ्या एसआरए अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांनी उग्र आंदोलन केलं. यातच आंदोलक नागरीकांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. कोर्टाचे आदेश झुगारून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करून नागरीकांसोबत ठाम उभे राहण्याचा विश्वास त्यांनी येथील रहिवाशांना दिला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे असं म्हणाले आहेत.

‘जनतेची ताकद काय असते, ती कोणालाही रस्त्यावर आणून दाखवू’

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ”भारतनगर असो किंवा उद्या धारावी असो, कुठेही जर असं झालं तिथे आम्ही मध्ये येणारच. तुम्हाला पुनर्विकास विकास करायचा असेल, तुम्हाला विकास करायचा असेल, स्वतः पैसे कमवायचे असतील, यासाठी आमचा कोणालाही विरोध नाही. मात्र मुंबईकरांच्या हृदयाला आणि घराला धक्का लावून हे आम्ही कदापि करू देणार नाही. तुम्ही जर करार करून त्यांच्या हक्काचं त्यांना देत असाल, तर तुम्ही येथे काम करू शकाल. मात्र करार न करता कुठेही कोणाला काय होत आहे, हे न सांगता, तुम्ही जर येथे दादागिरी करत असाल तर आम्ही ती करून देणार नाही, जनतेची ताकद काय असते, ती कोणालाही रस्त्यावर आणून दाखवू.”

‘एसआरएचे लोक निर्लज्जपणे अदानीची साथ देत होते’

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले , ”यात दुदैव म्हणजे, एसआरएचे लोक येथे येऊन निर्लज्जपणे अदानीची साथ देत होते. कायद्याची साथ नसताना देखील एसआरएचे लोक त्यांना साथ देत होते.” ते म्हणाले, ”पहिल्यांदा ही एसआरएकडून दादागिरी होत आहे, अशातच एसआरएचे अधिकारी करतायंत तरी काय? उद्या जर आम्ही एसआरएवर मोर्चा काढला आणि यांच्या घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला, तर कोण मध्ये येणार? आम्ही एसआरएलाही दाखवू की, तुम्ही जर या घरांना हात लावला, तर जिथे तुमचे अधिकारी राहतात, ही सगळी लोक तुमच्या घरी आणून बसवल्याशिवाय मी राहणार नाही, हा निरोप त्यांना देण्यासाठी मी येथे आलो आहे.”