WCL 2024 Final : टीम इंडियाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, लीजेंड्स लीगच्या फायनलमध्ये केला दारूण पराभव

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या पहिल्या हंगामावर हिंदुस्थानने नाव कोरले आहे. युवराज सिंहच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानने फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट्सने दारूण पराभव केला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 157 धावांचे आव्हान हिंदुस्थानने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 5 चेंडू राखून पार केले.

बर्मिंघमच्या एजबेस्टन येथे झालेल्या अंतिम लढतीत पाकिस्तानचा कर्णधार युनूस खान याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पाकिस्तानने निर्धारित 20 षटकांमध्ये 6 बाद 156 धावा केल्या. हे आव्हान हिंदुस्थानने अंबाती रायडूच्या 50, गुरकीत सिंह मानच्या 34 आणि युसूफ पठाणच्या 30 धावांच्या खेळीच्या बळावर 19.1 षटकांमध्ये पूर्ण केले.

पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवातचांगली झाली. सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडूने पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मात्र दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर उथप्पा बाद झाला. सुरेश रैनाही आल्या पावली माघारी परतल्याने टीम इंडियाची अवस्था 2 बाद 38 झाली.

या खराब स्थितीतून अंबाती रायडू आणि गुरकीरत सिंह मान याने टीम इंडियाला बाहेर काढले. दोघांमध्ये अर्धशतकीय भागिदारी झाली. यादरम्यान रायडूने 29 चेंडूत अर्धशतक झळकावले. मात्र त्यानंतर तो बाद झाला. पुढे कर्णधार युवराज सिंह (नाबाद 15), युसूफ पठाण (30) आणि इरफान पठाण (नाबाद 5) यांनी संघाला विजय मिळवून दिला. इरफान पठाणने विजयी चौकार ठोकला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला नेगीने 14 धावांवर पहिला धक्का दिला. त्याने कामरान अकमलला रायडूकरवी झेलबाद केले. त्यानंतर शोएब मलिक (41) वगळता इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या रचता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानला हिंदुस्थानपुढे मोठे लक्ष्य ठेवता आले नाही. हिंदुस्थानकडून अनुरीत सिंहने सर्वाधिक 3, तर विनय कुमार, इरफान पठाण आणि नेगीने प्रत्येकी एक विकेट घेतली.