विलासराव देशमुख हे माझे राजकीय गुरु होते. लातूरच्या ग्रामीण भागातील शेती बारा महिने ओलिताखाली असावी, हे स्वप्न विलासराव देशमुख यांचे होते. वॉटरग्रीडच्या माध्यमातून या भागात बारमाही पाण्याची व्यवस्था करण्याबरोबर इथल्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला चांगला दर मिळावा यासाठी लातूरमध्ये सोयाबीन केंद्र सुरु करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
लातूर ग्रामीणचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी रेणापूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लातूर शहर मतदारसंघाचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार अमित देशमुख, धीरज देशमुख, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार वझाहत मिर्झा, माजी आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, यशवंतराव पाटील, श्रीशैल उटगे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे, सर्जेराव मोरे, प्रमोद जाधव, आशा भिसे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडेंची जोडी या भागातील लोकांची काळजी घ्यायची. त्यांनी मांजरा व रेणा नदीमध्ये बॅरेजस टाकून पावसाळ्यात आलेले पाणी रोखले. त्यांना हा भाग बारमाही ओलिताखाली आणायचा होता. पण देवेंद्र फडणवीस यांची वॉटरग्रीडसाठी कधीच इच्छाशक्ती नव्हती. पण लातूरकरांना मी विश्वास देतो की, विलासराव देशमुख यांचे अधुरे राहिलेले स्वप्न आम्ही पूर्ण करु. या भागामध्ये वॉटरग्रीडच्या माध्यमातून इथे बारमाही पाणी देऊ, असा शब्द नाना पटोले यांनी यावेळी दिला.
देवेंद्र फडणवीस हे फक्त मोठमोठ्या योजनांची घोषणा करतात. मेगा भरती म्हणायचं आणि दुसरीकडे पेपर लीक करुन बेरोजगार युवकांची फसवणूक करायची. हेच काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केले, असा आरोप त्यांनी केला. महागाई प्रचंड वाढलेली आहे. सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. या जाहिरातबाज सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर तब्बल 6 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. हे पैसे तुमच्या, माझ्या खिशातून गेले असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख , खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी ही मनोगत व्यक्त केले.