
राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाटय़ाने खालावत आहे. परिणामी पाण्याची मागणी वाढत आहे. सध्याच्या घडीला राज्यातल्या तब्बल चौदा जिह्यांतील 784 गावे आणि वाडय़ांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवण्याची वेळ आली आहे. सध्याच्या घडीला गावकऱयांच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी 223 टँकर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सुमारे तीन हजार धरणांमधील पाण्याचा साठाही झपाटय़ाने खालावत आहे. सध्याच्या घडीला या सर्व धरणांतील पाणीसाठा फक्त 42.86 टक्क्यांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने पाणी पुरवठय़ाच्या स्थितीचा आढावा घेतला तेव्हा राज्यातल्या चौदा जिह्यांतील 178 गावे व 606 वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा होत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. या गावकऱयांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी खासगी 207 आणि सोळा शासकीय टँकर धावत असल्याची माहिती पुढे आली आहे.
सर्वाधिक टँकर पुण्यात
सध्या सर्वाधिक म्हणजे 65 टँकर पुण्यात धावत आहेत. त्याखालोखाल साताऱयात 40 टँकर गावागावात पाणीपुरवठा करीत आहेत. मागील आठवडय़ात राज्यात 178 टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी धावत होते, पण आता हा आकडा वाढला असून सध्याच्या घडीला 223 टँकर पाणीपुरवठा करीत आहेत.
धरणांतील पाणीसाठा
नागपूर 42.83 टक्के
अमरावती 51.03 टक्के
संभाजीनगर 42.38 टक्के
नाशिक 44.84 टक्के
पुणे 38.42 टक्के
कोकण 50.68 टक्के
जिल्हा आणि टँकरची संख्या
ठाणे 30
पालघर 16
संभाजीनगर 17
अमरावती 12
बुलढ़ाणा 22
सर्व धरणांमधील पाणीसाठा-42.86 टक्के