
केंद्राच्या भूजल प्राधिकरणाचे जाचक नियम राज्य सरकारने शिथील करावेत यासाठी मुंबईतील टँकर चालकांनी मुंबईत गुरुवारपासून सुरू केलेला संप आज शनिवारी तिसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. टँकरच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या प्रकल्पांची मोठी कोंडी झाली असून आर्थिक फटका बसत आहे.
मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेले बांधकाम प्रकल्प, व्यावसायिक, मॉल तसेच सरकारी इमारतींमधील कार्यालयांना विशेषकरून पालिकेकडून टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र टँकर चालकांवर लादलेल्या जाचक अटींमुळे संप पुकारण्यात आला आहे. याबाबत सरकारशी बोलणीही झाली. मात्र याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सरकार, पालिका आणि टँकर चालकांमध्ये शनिवारीदेखील चर्चा झाली. मात्र या वेळी कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे समजते. त्यामुळे अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील, अशी भूमिकाही टँकर चालकांनी घेतल्याचे समजते.
अशा आहेत अटी-शर्ती
- केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमानुसार, मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने मुंबईतील विहिरी आणि बोअरवेल मालकांना पालिकेची एनओसी घेणे बंधनकारक केले आहे.
- मात्र ‘एनओसी’ मिळवण्यासाठी विहिरीभोवतीची 2 हजार फुटांची जागा मोकळी सोडावी, पाणी भरताना टँकर्स सोसायटी किंवा चाळीजवळ उभे करू नयेत. पाण्याचे पूर्ण वर्षांचे पैसे आगाऊ भरावेत.
- टँकर्सवर मीटर बसवावेत, रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे यासह इतर अटी आहेत. मात्र यातील पहिल्या दोन अटी शिथील करा, अशी मागणी टँकर्स चालकांनी केली आहे.
सरकारने मुंबईला वाऱ्यावर सोडले
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे व्यावसायिक, बांधकाम प्रकल्प, हॉटेल आणि अनेक आस्थापनांमधील पाणीपुरवठा ठप्प झाला असताना सरकारकडून अद्याप कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारने मुंबईकर, व्यावसायिकांना वाऱयावर सोडले आहे का, असा सवाल निर्माण केला जात आहे.
तातडीने निर्णय घ्या अन्यथा शिवसेनेचे आंदोलन
मुंबईच्या विविध भागांत गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे. शिवाय काही ठिकाणी दूषित, गढूळ पाणीदेखील येत असल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने 48 तासांत पाणी प्रश्न सोडवावा अन्यथा सर्व वॉर्ड ऑफिसवर आंदोलन करून अधिकाऱयांना जाब विचारू, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.