अंधेरी, धारावी, भांडुप आणि वांद्रय़ात पाणीपुरवठा विस्कळीत

पवई येथे जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्ता पुलाजवळ 1450 मिलीमीटर व्यासाच्या तानसा जलवाहिनीला आज पहाटे मोठी गळती लागल्याने या जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. मात्र यामुळे एस विभाग भांडुप, के/पूर्व अंधेरी, जी/उत्तर धारावी आणि एच/पूर्व वांद्रे विभागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जल अभियंता खात्याकडून हाती घेण्यात आले असून या काळात नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.