पाणीटंचाईच्या झळा वाढल्या; शिरूरला दिवसाआड पाणीपुरवठा

राज्यभरात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असून, उन्हाच्या कडाक्याबरोबरच पाणीटंचाईच्या झळाही वाढत आहेत.
आंबेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त नऊ ग्रामपंचायती आणि वाड्या-वस्त्यांवर पिण्यासाठी 10 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यातील कारेगाव, पारगाव तर्फे खेड, कुरवंडी, निघोटवाडी, शिरदाळे, थुगाव, भावडी, लोणी, वडगाव पीर या गावांसह परिसरातील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई आहे. यातील गावठाण व वाड्या-वस्त्यांवरील 16 हजार 731 लोकसंख्येसाठी 10 पाण्याचे टँकर्स सुरू करण्यात आले आहेत. यांतील कारेगाव येथील कानिफनाथवस्ती, बेंदवस्ती, माळवस्ती, पारगाव तर्फे खेड येथील चिखलेवस्ती, पठारेवस्ती, मनकरवस्ती, घुलेवस्ती, बागलवस्ती, ढगे ठाकरवस्ती, निवळी, ठाकरवाडी, पवळेवस्ती, भागडेवस्ती, जाधववस्ती, चव्हाण पवारवस्ती, माळीमळा, भवानीनगरः कुरवंडी येथील मतेवाडी, गटेवाडी, कोंबडवाडी, दरावस्ती, वळणवस्ती, हरिजनवस्ती; निघोटवाडी येथील दस्तुरवाडी, कोळवाडी, आवळीवस्ती; थुगाव येथील सवाईमळा, नागूमळा, माळीमळा, कोल्हारवाडी, गणेशनगर, ठाकरवाडी; भावडी येथील रानमळा, चक्करवस्ती, नवलेमळा, कुदळेवस्ती, कातळेवस्ती, डोंगरवस्ती; लोणी येथील बांधणवस्ती, कौटकरवस्ती, लंकेवस्ती, खालचा गलठा, खंडागळेवस्ती, सावतामळा, शिवडीवस्ती, पैसावस्ती, बागवस्ती, डोंगरभाग, आढाव-थोरातवस्ती, वरचा गलठा; वडगाव पीर येथील पोखरकरमळा नं. 2 व 3, सांडभोरवस्ती, आदक भानभाववस्ती, पाटीलमळा, पोखरकरमळा, गुळवेवस्ती, वाळुंजवस्ती येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यातील पारगाव तर्फे खेड येथे दोन टैंकर व इतर आठ ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक टँकर सुरू आहे. तिरपाड, मांदळेवाडी, चिखली, धामणी, राजेवाडी येथील ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत. लवकरच त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू करण्यात येणार आहेत. तसेच ज्या गावांना पाण्यासाठी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे, त्यांनीही आपले प्रस्ताव अआंबेगाव पंचायत समिती कार्यालय घोडेगाव येथे द्यावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, उपविभागीय अभियंता व्ही. के. भंडारी यांनी केले आहे.

शिरूर : शिरूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी असल्याने शहराला दिवसाआड या जपून वापरावे, पाण्याचा अपव्य करणाऱ्या नागरिकांवर शिरूर नगरपालिकेच्या पथकाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील व पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर यांनी दिली.

कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांची शिरूर नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, लिपिक भूषण कडेकर यांनी भेट घेतली असून, शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी नंबर चारीमधील पाणी सोडण्याची मागणी केली असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, शहरामध्ये पाणीपुरवठा सुरू असताना नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, पाणी वाया जाऊ नये याकडे लक्ष द्यावे, रस्त्यावर, अंगणात पाणी मारू नये, नव्याने सुरू असलेले बांधकामे थांबवावीत. पाण्याचा अपव्यय करताना आढळणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदित्य बनकर यांनी दिला आहे.