
वडगावशेरीसह खराडीच्या अनेक भागांतील पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर विधानसभाध्यक्षांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वडगाव शेरीतील पाण्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र, हा अहवाल खोटा असून, नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावतच आहे, असा गंभीर आरोप वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी आज खराडीत केला.
पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी चंदननगर भागातील पाण्याच्या टाकीसमोर सामाजिक कार्यकर्ते संकेत गलांडे उपोषणाला बसले होते. त्यावेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
पठारे म्हणाले, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वडगाव शेरीत पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाण्याचे राजकारण केले जात आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती अर्ज करून झाले आहेत. विधानसभाध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर अहवाल सादर करून त्यांचीही दिशाभूल केली आहे. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हक्काचे पाणी चोरीला वडगाव शेरीकरांच्या हक्काचे पाणी चोरीला जात आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. खराडी-चंदननगरला होणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. एक्स्प्रेसला जोडलेले कनेक्शन तत्काळ बंद करावे, आमच्या भागाला सुरळीत पाणीपुरवठा करावा, या आमच्या मुख्य मागण्या आहेत. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर नगर रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संकेत गलांडे यांनी दिला.
पाणीपुरवठा होत नाही, त्याठिकाणी पाहणी केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. थिटे वस्ती, सातव वस्ती तसेच काही सोसायट्यांमध्ये पाणी कमी दाबाने येत आहे. तीही समस्या सोडवली जाईल, पाण्याची चोरी करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.
• इंद्रभान रणदिवे, अधीक्षक अभियंता
महिलांचा अधिकाऱ्यांना घेराव
व्हॉलमनकडून पाणी सोडण्यासाठी पैशांची मागणी केली जात आहे. जे नागरिक पैसे देत आहेत, त्याच भागाला पाण्याचा पुरवठा सुरळीत होत आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा, अशी मागणी यावेळी महिलांनी केली. उपोषणादरम्यान पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी महिलांनी त्यांना घेरावा घातला. त्यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.