पारा चढला, सांगली जिल्ह्यात टंचाईच्या झळा; तलाव, विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठा चांगला आहे. अद्याप अर्धा पाणीसाठा असला तरी गेल्या महिन्याभरातील पाणीसाठ्यात झपाट्याने घसरण होत आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत 23 टक्के जादा साठा असल्याची बाब दिलासादायक आहे. परंतु, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने तलाव, विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. अद्याप टँकरची मागणी नसली तरी जिल्ह्यातील काही तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. येत्या आठवड्याभरात दुष्काळी भागातून टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरले जाण्याचे चित्र दिसून येत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यानंतरही बराच काळ ढगाळ हवामान राहिले. त्यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत मोठी वाढ झाली होती. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसामुळे तलावात पाणीसाठा वाढला होता; परंतु या भागात बागायती क्षेत्र वाढल्याने पिकांना पाणी देण्यासाठी उपसाही वाढला आहे. त्यामुळे पाणीपातळी घटली आहे.

यंदा जिल्ह्यात उन्हाळी पावसाने दडी मारली, त्यातच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची पातळीही कमी होऊ लागली. पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने या प्रकल्पातील पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी केला. दुष्काळी पाण्यासह अन्य तालुक्यातही उन्हाळी पावसाने दडी मारली, त्यामुळे पाणीटंचाईचे सावट आले आहे. त्यातच मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठाही कमी होत चालला आहे.

दुष्काळी तालुक्यांना सिंचन योजनांचा दिलासा आहे. परंतु, प्रकल्पातील पाणीसाठ्याची टक्केवारी 51 टक्के असली तरी महिन्याला 10 ते 11 टक्क्यांनी पाणीसाठा कमी होत असल्याचे चित्र आहे. सिंचन योजनाद्वारे तालुक्यातील सर्व तलाव पुन्हा भरून घ्यावेत, अशी मागणी आहे. दुष्काळी भागात शेती, जनावरांसाठी व पिण्यासाठीच्या पाण्याची परिस्थिती बिकट होत आहे. अद्याप टँकरची मागणी मात्र झालेली नाही.

जत पूर्वमध्ये टंचाईची स्थिती असून, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी या तालुक्यांना सिंचन योजनांचा दिलासा आहे; मात्र पाणी वाटपात काटेकोर नियोजनाची गरज आहे. हे नियोजन पोटकालवे, शाखा कालव्यांपर्यंत व्हायला हवे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता मार्चपासून जत पूर्वभागात टंचाईबाबत उपाययोजना कराव्या लागतील.

वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, सर्वत्रच भूजल पातळी कमी झाल्याने टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत जिल्ह्यात उन्हाळी पेरणी सुरू होणार आहे.

टंचाई आराखड्याची कार्यवाही सुरू

 ■ गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही यंदा टंचाई जाणवत आहे. सद्यः स्थितीत जिल्ह्यातील 40 गावांना पाण्याची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. त्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मे आणि जून महिन्यात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे, याबाबतचा संभाव्य टंचाई आराखडा तयार केला जात आहे.

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस 

मागीलवर्षी जूनमध्ये टंचाईची तीव्रता वाढली होती. मात्र, त्यानंतर पावसाळ्यात जोरदार अतिवृष्टी झाली. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत समाधानकारक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात तब्बल 164 टक्के पावसाची नोंद झाली होती. जत तालुक्यात 130, खानापूर 140, कडेगाव 143 टक्के वगळता उर्वरित तालुक्यांमधये 175 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला.